लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रामध्ये सहा ते सात केंद्रीय मंत्रिपदे दिली जाणार असल्याचं दिसत आहे. यामध्ये पुण्याचे तरुण खासदार मुरलीधर मोहोळ यांची देखील वर्णी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाकडून त्यांना शपथविधीसाठी फोन देखील आला आहे. मोहोळ हे पहिल्यांदाच पुणे लोकसभेतून विजयी झाले असून महाराष्ट्रातील प्रभावी मराठा चेहरा म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार सामना झाला. यामध्ये भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी तब्बल १ लाख 23 हजारांच्या मताधिक्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. महाराष्ट्रामध्ये यंदा भाजपची मोठी पीछेहाट झाली आहे. 23 खासदारांची संख्या थेट ९ वर घरसल्याने भाजपला मोठा धक्का बसला. यामध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर देखील विरोधात गेल्याचं स्पष्ट झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रमध्ये मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने समाजातील नेतृत्वाला संधी देण्यात आल्याचं बोलले जात आहे.
सलग तिसऱ्यांदा भाजपने पुण्याची जागा राखली. मुरलीधर मोहोळ यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात बूथ स्तरावरील कार्यकर्ता म्हणून झालेली आहे. कोथरूड विधानसभा अध्यक्ष, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुण्याचे महापौर, महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस म्हणून देखील मोहोळ यांनी काम पाहिलेल आहे.