पुणे : पुणे येथील लाल महालात छत्रपती शिवरायांचे बालपण गेले, त्या महालबद्दल शिवप्रेमींच्या मनात एक वेगळे स्थान आहे. अशा या पवित्र लाल महालात अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक आयोजित केला जातो. शिवराज्याभिषेकाचे लाल महालातील हे 10वे वर्ष आहे.
महाराष्ट्राच्या मातीला दोन सुवर्णक्षण बघायला मिळाले. पहिला क्षण जिजाऊंनी बाळ शिवबांच्या हातात सोन्याचा नांगर देऊन पुण्याची भूमी सोन्याच्या नांगराने नांगरून समाज परिवर्तनाची पहिली मुहूर्तमेढ पुण्याच्या भूमीत रोवली तो क्षण लाल महालाने अनुभवला. आणि दुसरा क्षण खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वतंत्रता दिवस म्हणून ज्या दिवसाकडे बघितलं जाते तो ६ जून १६७४ छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक..तो क्षण शिवतीर्थ किल्ले रायगडाने अनुभवला आहे.
6 जून 2024, शिवराज्याभिषेकाचा हा सुवर्णक्षण लाल महालात समस्त शिवप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. शिवमूर्तीवर शिवगीतांच्या उच्चारात व प्रचंड घोषणा देत पुष्पाभिषेक करण्यात आला. किल्यांवरील पवित्र जल तसेच इंद्रायणीच्या पवित्र पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. शिवराज्याभिषेकाचे पौरोहित्य शिवश्री कैलास वडघुले आणि कु. स्वरा धुमाळ यांनी केले आहे.
शिवराज्याभिषेक कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाईंची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, सारथी संस्थेचे संचालक आयएएस अशोकराव काकडे, ज्येष्ठ लेखिका सुवर्णा ताई निंबाळकर, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संचालक सौ.हर्षदा देशमुख जाधव, चळवळीतील कार्यकर्त्यांचे वकील म्हणून ओळख असलेले अॅडव्होकेट मिलिंद पवार, भास्करराव काळे व मान्यवर उपस्थित होते.
पुढील राज्याभिषेक कार्यक्रमापूर्वी लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी यावेळी सर्व शिवप्रेमींच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी बोलताना मा. विकास पासलकर म्हणाले छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्य रयतेच राज्य निर्माण केलं त्यांना कुठल्याही जाती धर्माच्या कोंदणात बांधून संकुचित करू नये कारण जगाच्या इतिहासात असा राजा होणे नाही, नेतृत्व, कर्तृत्व, संस्कार, प्रजादक्ष, राष्ट्राभिमान स्वाभिमान, सर्व सामान्य रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा, केवळ विचारातून नव्हे तर कृतीतून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचं काम या महामानवानं केलं. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या समस्त शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवरायांसारख्या जागतिक कीर्तीच्या राजाचा राज्याभिषेक हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. शिवरायांच्या जीवन चरित्रातून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रचंड मोठी प्रेरणा मिळते असे प्रतिपादन सारथीचे संचालक अशोकराव काकडे यांनी केले.
पुणे हीट अँड रण प्रकाराला वाचा फोडणाऱ्या पत्रकार अर्चना मोरे यांचा सन्मान करण्यात आला. पुणे शहराला ड्रग मुक्त, व्यसन मुक्त करण्यासाठी शपथ उपस्थिनानी घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थित सर्वच मान्यवरांनी समस्त शिवप्रेमींनी साडे तीनशेव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवराज्याभिषेक कार्यक्रमासाठी प्रशांत धुमाळ, निलेश इंगवले, मंदार बहिरट, रोहित ढमाले,सचिन जोशी, युवराज ढवळे, नानासाहेब कदम, सचिन भांबरे, जयंत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.