पुणे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजून कौल दिला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असणाऱ्या बारामती लोकसभेत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे या विजयी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झास्यानंतर गुरुवारी सुप्रिया सुळे पुण्यातील संपर्क कार्यालयात आल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुळे यांचे जोरदार स्वागत केले. ढोल-ताशांच्या निनादात गुलाल उधळत त्यांचा विजय साजरा करण्यात आला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीवर जोरदार टीका केल्याचे पहायला मिळाले आहे.
“महाविकास आघाडीला राज्यात मिळालेले यश हे कार्यकर्त्यांचे आहे. गेले एक वर्ष महाविकास आघाडीसाठी संघर्षाचे राहिले. महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार राज्यात बोकाळला होता. मात्र, त्याकडे लक्ष न देता ईडी, सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दडपशाहीला मतदारांनी नाकारले”, बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे महायुतीवर टीका केली आहे.
“वयाने आणि कर्तृत्वाने मोठे असणाऱ्यांना सल्ला द्यायचा नसतो, तर त्यांचा सल्ला घ्यायचा असतो. बारामतीमध्ये झालेला विकास कोणीही नाकारला नव्हता. लोकसभेची निवडणूक वैयक्तिक नव्हती, तर ती विचारधारेच्या विरोधात होती”, असे म्हणत अजित पवारांना कोणाताही सल्ला देणार नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीच्या पराभवाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्यामुळेच…’
-शुभेच्छा लोकसभेच्या अन् तयारी विधानसभेची, पर्वतीत भिमालेंनी ‘टायमिंग’ साधला
-प्रतिक्षा संपणार! येत्या ५ दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाचा इशारा
-काका अजित पवारांपुढे पुतण्या दंड थोपटणार, बारामतीत मोर्चेबांधणीला सुरुवात? युगेंद्र पवार म्हणाले…
-रासनेंनी चॅलेंज पूर्ण केलं.. धंगेकरांचा कसब्यातच करेक्ट कार्यक्रम! नेमकं काय घडलं?