पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जवळपास १ लाख 23 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे पाहायला मिळालं. निवडणुकीपूर्वी दंड थोपटणारे वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांची हवा सोशल मीडियापर्यंतच मर्यादित राहिली, तर एमआयएमच्या उमेदवाराला हजारांचा टप्पा पार करतानाही घाम फुटला. मोहोळांच्या विजयानंतर आता कोणत्या विधानसभा मतदारसंघातून कितीचे मताधिक्य मिळाले? याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. मोहोळ यांच्या अंगावर गुलाल पडला असला तरी भाजपचे दोन आमदार मात्र ‘डेंजर झोन’मध्ये आल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे.
मतमोजणीला सुरुवात होण्याच्या काही मिनिटा अगोदरपर्यंत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्याकडून भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूडमध्येही लीड घेण्याचा दावा केला जात होता. मात्र कोथरूडकरांनी आपला घरचा उमेदवार असणाऱ्या मोहोळांवर मतांचा पाऊस पाडल्याने ७४ हजारांचे मताधिक्य भाजपला येथून मिळाले. तर माधुरी मिसाळ आमदार असणाऱ्या पर्वतीमध्ये २९ हजारांचे आधिक्य मोहोळांना मिळाले.
वर्षभरापूर्वी कसब्यात पोटनिवडणुकीमध्ये ११ हजारांच्या लीडने धंगेकर विजयी झाल्याने येथून अधिकचे मते मिळण्याची काँग्रेसला आशा होती. परंतु ‘मागच्याच ठेस पुढचा शहाणा’ म्हणी प्रमाणे भाजपने येथे आपले संघटन मजबूत करत १५ हजारांचे मताधिक्य राखत कसबा भाजपचाच असल्याचं दाखवून दिलं. येथे निवडणूक प्रमुख हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर आणि पक्षाची मजबूत संघटना भाजपच्या कामाला आली. तर वडगाव शेरीमधून भाजपला १४२०० मतांची आघाडी राखता आली.
शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला धक्का
भाजपचे आमदार आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा मतदारसंघ असणाऱ्या शिवाजीनगर मध्ये अवघे तीन हजारांचे मताधिक्य मिळवण्यात भाजपाला यश आल आहे. एवढा टप्पा गाठतानाही भाजपची येथे दमछाक झालीय. तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघात रवींद्र धंगेकर यांना तब्बल 16 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने भाजपचे आमदार सुनील कांबळे यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचा निसटता पराभव झाला, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाजपच्या पथ्यावर पडल्याचं पहायला मिळालं. आता लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगरमधून मिळालेले काही हजारांचे मताधिक्य आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये झालेली पीछेहाट भाजपची डोकेदुखी वाढवणारी आहे.