शिरुर : लोकसभा निवडणूक मतमोजणीतील शेवटच्या चरणातील मतमोजणीचा कल समोर आला. राज्यात आणि केंद्रात ‘इंडिया आघाडी’ची मुसंडी असून, तसेच चित्र शिरुर लोकसभा मतदार संघात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा विजय निश्चित झाला आहे, तर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेना शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबियांचा कट्टर विरोधक म्हणून आढळराव पाटील यांची ओळख होती. किंबहुना, राष्ट्रवादीच्या विरोधातील मतदार आढळरावांच्या पाठिशी होता. मात्र, या निवडणुकीत तिकीटाच्या रस्सीखेचमध्ये आढळरावांना ‘घड्याळ’ हातावर बांधावे लागले.
मतदार संघातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर, हडपसर आणि भोसरी अशा सहापैकी ४ मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असतानाही आढळराव यांना पिछाडीवर रहावे लागले आहे. अमोल कोल्हे यांच्या विरोधात रान पेटवणारे राष्ट्रवादीचे दिग्गज आमदार दिलीप मोहिते यांना खेडमध्ये मताधिक्य देता आले नाही, अनेक वर्षे कॅबिनेट मंत्री राहिलेले दिलीप वळसे-पाटील आंबेगावमधून ‘सपशेल फेल’ ठरले आहेत. जुन्नरमधील आमदार अतूल बेनके, हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना कोल्हेंना पराभवापासून लांब ठेवता आले नाही.
दरम्यान, मावळप्रमाणे आढळराव पाटील यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हावर ही निवडणूक लढवली असती, तर आढळराव पाटील यांना फायदा झाला असता. कारण, राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हाला मतदारांनी नाकारले. भोसरी वगळत सर्वच विधानसभा मतदार संघात आढळराव पाटील पिछाडीवर राहिले आहेत. परिणामी, आढळरावांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील प्रवेश मतदार आणि कार्यकर्त्यांनाही रुचलेला नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांना काकांविरोधात बंड भोवले; बारामतीत सुप्रिया सुळेंचा १ लाखापेक्षा जास्त लीडने विजय
-पैलवानानं मैदान मारलं: पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ; धंगेकरांचा दारुण पराभव
-‘काय म्हणता पुणेकर निवडून आलाय मुरलीधर’; थेट काँग्रेस भवनाच्या दारावर पोस्टर लावत धंगेकरांना डिवचलं
-मोहोळांची गाडी सुसाट: बाराव्या फेरीतही घेतली इतक्या मतांची आघाडी
-Pune | मुरलीधर मोहोळांचा पुन्हा आघाडी; किती मतांनी घेतली आघाडी?