पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल करण्यात आला. या आरोपाखाली आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल आणि ससून रुग्णालयातील २ डॉक्टर डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ यांना अटक करण्यात आली आहे. यांनाच मुलाच्या आई शिवानी अग्रवालने देखील मदत केली असल्याचे आता समोर आले आहे. याच प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.
तिच्याकडे अपघाता संबंधी आणि रक्ताचे नमुने बदलण्यात आल्यासंबंधी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तिला आज पहाटे राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मुलाचे ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने वैद्यकीय चाचणी दरम्यान बदलण्यात आले होते. यासोबतच अपघात घडला त्यावेळी गाडीमध्ये असलेल्या त्याच्या अन्य दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने देखील बदलण्यात आल्याचे सांगण्यात येते. ससून मधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी आलेल्या त्री-सदस्य समितीने दिलेल्या अहवालात या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले आणि त्या जागी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.
Pune car accident case | Mother of the minor accused arrested in the case: Pune Police Commissioner Amitesh Kumar
(File photo)#Maharashtra pic.twitter.com/9U64dsGGxv
— ANI (@ANI) June 1, 2024
रक्ताचे नमुने बदलले असले तरी ते कुणाचे आहेत याचा शोध घेताना ते एका महिलेचे आहेत अशी माहिती समोर आली होती. त्याचवेळी मुलाच्या आईवर संशय आल्याने त्या दिशेने तपास सुरू झाला. या काळात मुलाची आई शिवानी अग्रवाल या बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेत अखेर पुणे पोलिसांनी अग्रवाल यांना अटक केली आहे. दरम्यान, शिवानी अग्रवाल यांना आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलीस आता तिच्याकडे या संदर्भात चौकशी करणार आहेत. तसेच बालन्याय मंडळाने पुणे पोलिसांना मुलाची चौकशी करण्यासाठी २ तासांची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पोलीस बालन्याय मंडळात या मुलाकडे चौकशी करणार आहेत. त्याच वेळी त्याच्या आईकडे देखील समोरासमोर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प
-प्रांताधिकार्याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?
-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे
-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी
-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”