पुणे : पुणे शहरामध्ये झालेल्या अपघातावरुन शहरात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. यातच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधीऱ्यांवर, पोलीस प्रशासन, ससून रुग्णालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अल्पवयीन आरोपी अग्रवालला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. अल्पवयीन आरोपी तसेच त्याचे २ मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. हरनोळ यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु असताना देखील अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
“पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. पुण्यात महाराष्ट्रातून आणि बाहेरून अनेक तरुण तरुणी शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी येतात. छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांनी पुण्याला वैभव मिळवून दिले. तसेच देशाला दिशा देणारे अनेक मान्यवर पुण्यात होवून गेले. अशातच पुण्याला काळिमा फासणाऱ्या घटना मधल्या काळात घडल्या आहे. मागील पाच-सहा वर्षांत फोफावलेल्या पब संस्कृती आणि अंमली पदार्थांमुळे पुण्याचं स्वरूप ‘उडता पंजाब’ सारखं झालं असून पुण्याच्या वैभवशाली इतिहासाला काळिमा फसणाऱ्या घटना मागील काही काळात घडल्या आहेत”, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
‘उडता पंजाब’ सारखं ‘उडतं पुणे’
“गेल्या ५-६ वर्षांमध्ये पब संस्कृती पुण्यात आली. त्यामुळे ‘उडता पंजाब’ सारखं ‘उडतं पुणे’ असं पुण्याचं स्वरूप झालं. पुण्यात अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात याबद्दल बाजू मांडली. परंतु तरीही कोणी दाद देत नव्हतं किंवा लक्ष देत नव्हतं. त्यानंतर संवैधानिक मार्गाने मी रस्त्यावर आलो. समाजालाही रस्त्यावर घेतलं. त्यामध्ये पुणे शहरातून पब संस्कृती बंद व्हावी अशी मागणी केली असल्याचे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे.
“उमलती फुले कोमजण्याचे काम हे करत आहेत”
“सगळे लोक, मुले-मुली हे चांगले राहायला हवे. कारण ही मुले आता उमलती फुले असून ते कोमजण्याचे काम हे ही पब संस्कृती आणि अंमली पदार्थ करत आहेत. पुणे हे मर्यादीत राहिले नसून पुण्यामध्ये देश दिसतो. देशभरातून मुले तिथे येतात. मला अनेक शहरांतून फोन येतात. आमची मुले पुण्यात शिकत आहेत. मात्र आमच्याकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर असे वाटते की, कुणीतरी यांच्या मुलांची बाजू घेत आहे. हे काम करत असताना लक्षात येते की, लोकांनी रस्त्यावर आले पाहिजे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात धक्कादायक प्रकार; जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न
-एमपीएससीच्या PSI परिक्षेचा निकाल जाहीर; पुण्यातील अजय, मयुरीने मारली बाजी
-मनोज जरांगे पुणे कोर्टात हजर नेमकं कारण काय? म्हणाले….
-आरोपींना वाचवण्यासाठी नको ते उपद्वाप; ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी मध्यरात्री गाडीतून कोणाला आणलं?