पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागामध्ये एक अपघात झाला. या अपघाताने संपूर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली आहे. कारण या अपघातामध्ये बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने दुचाकीस्वाराला चिरडले. या अपघातामध्ये २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरुन राज्यासह देशातून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे युवक काँग्रेसने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली आहे.
काँग्रेसकडून आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विषयही अत्यंत लक्षवेधी ठेवले आहेत. निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिकदेखील देण्यात येणार आहे. कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर ही निबंध स्पर्धा रविवार, २६ मे रोजी सकाळी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात येणार आहे. काँग्रेसने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेला कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट दिली. यावेळी धंगेकरांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
निबंध स्पर्धेचे विषय
माझी आवडती कार ( पॉर्शे ,फरारी,मर्सिडीज,)
दारूचे दुष्परिणाम
माझा बाप बिल्डर असता तर?
मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर?
अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?
रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
‘पुणे हे विद्येचे माहेरघर आहे देशाला दिशा देणारे शहर म्हणून याची ओळख आहे. देशविदेशातून पुणे शहरात शिक्षणासाठी विद्यार्थी येतात मात्र ते विद्यार्थी इथून बाहेर जाताना पब पार्टीचे पुणे शहर ही ओळख घेऊन जातात. शहरातील पब हे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या तसेच पोलीसांच्या परवानगीनेच सुरू झाले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री आले आणि सारवासारव करून निघून गेले. पोलिसांचे वर्षानुवर्षाचे पाप आता उघडकीस येत आहे. अनेक पोलीस या लोकांना पाठिंबा देत असताना दिसत आहे. पोलिसांचे निलंबन करून चालणार नाही त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा”, अशी देखील मागणी रवींद्र धंगेकर यांनी माध्यामांशी बोलताना केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run | पोर्शे अपघातानंतर व्हायरल रॅपर वेदांत अग्रवाल नाही, मग कोणी केला ‘तो’ रॅप?
-पुणे अपघात प्रकरणी संजय शिरसाटांनी धंगेकरांना फटकारलं, म्हणाले, ‘राजकीय स्टंटबाजी थांबवा अन्…’