पुणे : पुण्यातील ब्रह्मा रिॲल्टी अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर या प्रसिद्ध बांधकाम कंपनीचे मालक विशाल अगरवाल यांच्या १७ वर्षीय मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने गाडी चालवत एका मोटारसायकल चालकाला उडवलं. या अपघातामध्ये मोटारसायकल तरुण चालक आणि एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा अलिशान पोर्शे स्पोर्ट्स कार चालवत होता. कल्याणीनगर येथील लँडमार्क सोसायटीजवळ मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात अनिश अवधिया (वय २७) आणि अश्विनी कोस्टा (वय २५) यांचा जागीच मृत्यू झाला.
विशाल अगरवाल यांच्या १७ वर्षीय मुलावर भादंवि कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन अधिनियम कलम १८४, ११९/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अकिब रमजान मुल्ला यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी मुलगा हा दोनच दिवसांपूर्वी बारावी उत्तीर्ण झाला आहे. तो सीबीएससी बोर्डात शिकतो. बारावी उत्तीर्ण झाल्याने त्याने मित्रांसह पार्टी करण्याचे ठरवले होते.
मृत्यू झालेले अनिश आणि अश्विन हे दोघेही आयटी अभियंते होते. ही धडक एवढी भीषण होती की मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली तरुणी १५ फूट उंच उडून रस्त्यावर जोरात आदळली. ३ मित्रांना घेऊन सदर अल्पवयीन आरोपी शनिवारी पार्टी करण्यासाठी तो मुंढवा येथील कोजी रेस्टॉरंटमध्ये गेला. या ठिकाणी सुरू असलेल्या बड्या उद्योजकांच्या मुलांच्या एका पार्टीत सहभागी झाला होता.
साधारणपणे २० मिनिटे या ठिकाणी तो थांबला. त्यानंतर तो बाहेर पडला. तेथून तो आणि त्याचे मित्र मॅरियट सुट्समधील ब्लॅक नावाच्या पबमध्ये गेले. या ठिकाणी पार्टी करून सर्वजण बाहेर पडले. त्याने गाडी स्वत: चालवायला घेतली. ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्यावेळी त्याचे दोन मित्र गाडीत बसलेले होते. हे सर्व जण प्रचंड वेगात कोरेगाव पार्क, नार्थ मेन रस्ता, आगाखान पुलावरून कल्याणीनगर विमानतळ रस्त्यावरून जात होते.
बड्या बापाचा मुलगा घेऊन आलेल्या पोर्शे गाडी तब्बल पावणे २ कोटी किंंमतीची आहे. या कारचे रजिस्ट्रेशनच झालेले नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे या गाडीला नंबरच मिळालेला नव्हता. विना नंबर प्लेटची ही गाडी रस्त्यावर भरधाव चालवल्याने २ जणांचा जीव मात्र गेला. एवढी वेगवान गाडी पालकांनी अल्पवयीन मुलाच्या हातात दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, संतप्त नागरिकांनी ‘सर्वसामान्यांसाठी नियम आणि धनदांडग्यांना मात्र रान मोकळे’ अशी स्थिती असल्याची टीका सुरू केली.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात होर्डिंग कोसळल्याप्रकरणी जागामालकासह होर्डिंग कंपनीवर गुन्हा दाखल
-…अन्यथा बैलगाडा शर्यतीत भाग घेता येणार नाही; बैलगाडा शर्यती संदर्भात नवीन नियमावली जाहीर
-Kangna Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड क्षेत्र सोडून देणार’; कंगना रणौतचा मोठा निर्णय
-Entertainment : नवाजुद्दीन सिद्दीकीला आवडते ‘ही’ देशी दारु; किंमत ऐकून व्हाल थक्क
-सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; ‘गुलाल आपलाच’ म्हणत ठिकठिकाणी बॅनर