पुणे : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातून रोज गुन्हेगारीच्या बातम्या समोर येत आहेत. ड्रग्ज प्रकरण असेल, दिवसा गोळीबार, हत्या, आत्महत्या, बलात्कार असे अनेक गुन्हे शहरात घडत आहेत. त्यातच आता शहरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात अनेक कंपन्या, कॉलेज आहेत. या ठिकाणाहून अनेक छेडछाडीच्या घटना समोर येत असतात. असाच एक संतापजनक प्रकार पुण्यातील एका ट्रेनिंग सेंटरमधून समोर आला आहे. डीप नेक आणि शॉर्ट ड्रेसमध्ये यायचं, अशी भलतीच अट ट्रेनिंग सेंटरच्या मालकाने घातल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ८ मे ते १४ मे या कालावधीत कोथरूड येथील गामाका एआयआयटी ट्रेनिंग सेंटर येथे घडला. याबाबत निगडी परिसरातील एका हॉस्टेलवर राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन महेश गंगाधर कनेरी (५१, रा. लोट्स लक्ष्मी, विकासनगर, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कनेरी याचे कोथरूड येथे गामाका एआयआयटी ट्रेनिंग सेंटर आहे. या ट्रेनिंग सेंटरमध्ये पीडित तरुणी नोकरी करते.
मंगळवारी (दि. १४ ) फिर्यादी कामावर आल्या असता, आरोपीने अशा कपड्यांमध्ये का आलीस, आपल्या संस्थेमध्ये कामावर येताना डीप नेक आणि शॉर्ट ड्रेस घालून यायचे असते तुला माहीत नाही का? तसेच माझ्यासोबत बिझनेस मीटिंगसाठी हॉटेलमध्ये येशील का? दुसऱ्या मुली माझ्यासोबत येतात, पैशाची काही कमी पडणार नाही, असे म्हणत करिअर बाद करण्याची धमकीदेखील दिली असल्याचे तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलीस आयुक्तालयासमोरुन पोलिसांचीच वाहने चोरी; सर्वसामान्यांच्या वाहन सुरक्षिततेचं काय?
-सावधान! पुण्यात डेंग्यूचा धोका वाढतोय; वाचा काय आहेत लक्षणे? कशी काळजी घ्याल?