पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार असून प्रचारासाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. महायुतीकडून लढणारे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एमआयएम चे उमेदवार अनिस सुंडके यांच्यामध्ये येथे प्रमुख लढत होत आहे. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच धंगेकर यांच्यासाठी डोकेदुखी वाढवणारी बातमी पुढे आली आहे. त्यामुळे ऐन मतदानापूर्वी त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
AIMIM चे उमेदवार अनिस सुंडके यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या वफ्फ बोर्डाची जमीन लाटण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार केली होती. धंगेकर यांनी राजकीय प्रभाव टाकून वक्फ बोर्डाची मालमत्ता बळकावल्याची तक्रार नुकतीच पुण्यातल्या मुस्लिम नागरिकांनी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे केली होती. त्याची दखल घेत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील सव्हे नंबर १६६/१ या भूखंडावर चालू असणारे बांधकाम ताबडतोब थांबवण्याचा आदेश दिला आहे. या कामासाठी देण्यात आलेले कमेन्समेन्ट सर्टिफिकेट देखील ताबडतोब रद्द करण्यात यावे. या संबधी केलेली कार्यवाही कळवण्यात यावी, असाही आदेश वक्फ बोर्डाने पुणे महापालिकेच्या आयुक्तांना दिला आहे. वक्फ बोर्डाच्या या निर्णयामुळे रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का मानला जात आहे.
रविवार पेठेतील लक्ष्मी रस्त्यानजीक सीटीएस नंबर ९६६/१ हा तब्बल १ हजार ६०७ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे. या मोक्याच्या भूखंडावर प्रतिभा रविंद्र धंगेकर आणि त्यांच्या भागीदारांनी बेकायदेशीरपणे निवासी व व्यावसायिक कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरु केल्याची तक्रार करण्यात आली होती. गेल्यावर्षी कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जिंकल्यानंतरच रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि खासगी विकसकाने हा व्यवहार पूर्ण केला. त्यामुळे राजकीय वजन वापरून हा व्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती.
दरम्यान, “वक्फ बोर्डाच्या आदेशामुळे कोट्यवधी रुपयांचा भूखंड बळकावण्याच्या धंगेकरांच्या प्रयत्नांना चपराक बसली आहे. या भूखंडाचा विक्री व्यवहार कसा झाला, या भूखंडावरील निवासी-व्यापारी कॉम्प्लेक्सच्या बांधकामास महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोणत्या कायद्याने परवानगी दिली, या प्रकरणात कोणत्या अधिकाऱ्यांचा सहभाग या सर्व प्रकाराची आता चौकशी होईल. दोषींना तुरुंगात जावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी व्यक्त केली. मुस्लिम समाजाच्या मालकीची कोट्यवधींची मालमत्ता वाचवण्यात यश आल्याचे समाधान आहे, असेही सुंडके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘रवींद्र धंगेकर यांचं काम दाखवा, हजार रुपये मिळवा’; भाजपच्या रासनेंची अनोखी ऑफर
-मुरलीधर मोहोळांसाठी उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
-“मी माझ्या राजकीय जीवनात मोठी चूक केली ती म्हणजे…”; अजित पवार असं का म्हणाले?
-“शरद पवार जे म्हणतील तेच उद्धव ठाकरे करतील”; फडणवीसांचा ‘त्या’ चर्चेवरुन फडणवीसांना खोचक टोला
-“मला कोणी खोट्यात काढलं तर मी सहन नाही करणार, मी कोणाच्या ५ पैशात मिंदा नाही”