पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रंगली आहे. राज्यातील सर्वात चर्चेत असणारा शिरुर मतदारसंघात महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी खासदार निधी आणला नसल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आहेत.
“मागील ५वर्षात शिरूर मतदारसंघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. ८० टक्के खासदार निधी वाया गेला. विद्यमान खासदार मतदारसंघात फिरकलेच नाहीत. अनेक गावात त्यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत”, अशी टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यामान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर केली आहे.
“गावोगावी अमोल कोल्हे विरोधातील फलक लावले आहेत. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्या विषयी आक्रोश आहे. आज पर्यंत मी केलेल्या प्रचाराला उस्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माझ्या प्रचाराला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहता हडपसर मतदार संघातून मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल”, असा विश्वास देखील आढळराव पाटलांनी व्यक्त केला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची आज मांजरी परिसरात प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. मांजरी बुद्रुक येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. वाजत गाजत काढण्यात आलेल्या या प्रचार रॅलीला नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी यामध्ये आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे, कार्याध्यक्ष अमर तुपे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान मोदींचा सत्कार करताना मोहोळ अचानक थांबले अन् सुनेत्रा पवारांना पुढे बोलवलं, पहा काय झालं
-पंतप्रधान मोदींचा पहिल्यांदाच पुणे मुक्काम; राजभवनाला छावणीचं स्वरुप
-Summer Food : उन्हाळ्यात आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ पचायला उत्तम! आजच आहारात करा समावेश!