बारामती : लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि पवार कुटुंबातही फूट पडली आहे. पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीचे येत्या लोकसभा निवडणूक २०२४ वर मध्ये पडसाद उमटले आहेत. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील २ सदस्य एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटाकडून भावनिक होऊन आवाहन केलं जात आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील कार्यकर्ता मेळाव्यात आवाहन केलंं आहे.
“आता निवडणुकीला साहेब उभे नाहीत, मीही उभा नाही. चाळीस वर्षांपूर्वी तुमच्या घरात आलेल्या सुनेला मत द्यायचं की मुलीला मत द्यायचं हे तुम्ही ठरवा. सुनेला मान असतो, तिला लक्ष्मी म्हटले जाते, सून घरात आल्यावर सासू सुनेच्याच हातात चाव्या देते ना, चुकलं तर जरूर सांगा, आईच्या पोटातून कोणीच शिकून येत नाही, मलाही बोलता येत नव्हते. संधी मिळाली की करून दाखवलच ना…. त्यामुळे भावनिक होऊ नका”, असे आवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
“ही निवडणूक भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे, शरद पवार यांना बारामती, माढा दोन्हीकडे लोकांनी निवडून दिले. नंतर त्यांनी राज्यसभेवर जायचा निर्णय घेतला. त्या नंतर पक्ष तुम्ही चालवा असे त्यांनी सांगितले, आम्ही त्याला मान्यता दिली. नंतर काही घटना घडल्या. कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्यांचा त्यांचा अधिकार आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“शेवटपर्यंत मला जे काही सांगितलं गेलं, तेच मी केलं, कुठही कमी पडलो नाही, साहेब फॉर्म भरून जायचे, शेवटच्या सभेला यायचे आणि आपण सगळी कामे करायचो. आज परिस्थिती बदलली आहे, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुमच्याकडे फक्त राज्याचाच निधी येणार असेल आणि केंद्राचा निधी येणारच नसेल तर विकास कसा होणार? पाण्याचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा असून तो सोडविताना आपल्याला राज्यासोबतच केंद्राचाही निधी लागणार आहे”, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘आमच्यावर टीका केल्याशिवाय मोदींंना झोपच लागत नाही’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका
-पुण्याच्या आरोग्य सुविधांना मोठा बूस्टर; बिबवेवाडीतील ईएसआयसी रुग्णालय लवकरच कार्यान्वित
-१२८ एकरांचे मैदान अन् २ लाख नागरिक; मोदींच्या सभेसाठी भाजपची जय्यत तयारी
-Ice Facial | चेहऱ्यावर बर्फ लावल्याने काय फायदे होतात तुम्हाला माहिती आहे का? एकदा हे वाचाच..