पुणे: पुणे शहरामध्ये वाढत्या उन्हासोबत लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण देखील चांगले तापल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासाठी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात आज काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना “पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे सध्या अशक्य आहे. त्यामुळे मुळशीतून पुण्यासाठी पाच टीएमसी पाणी मिळावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार” असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात मोहोळ यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे, माजी नगरसेवक योगेश मुळीक, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोहोळ म्हणाले की, ‘मी महापौर असताना 22 सप्टेंबर 2021 रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. हे धरण टाटा कंपनीचे आहे. कंपनीकडून पाणी मिळविण्यासाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. या योजनेतील 82 पैकी 51 टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, 20 टाक्यांचा वापर सुरू झाला आहे. बाराशेपैकी 921 किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या असून,वितरण वाहिन्यांचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. पन्नास टक्क्यांहून अधिक पाण्याचे मीटर्स बसविण्यात आले आहेत. या योजनेमुळे पाण्याची गळती कमी होणार असून, पुणेकरांना शुद्ध, पुरेसा आणि चोवीस तास पाणीपुरवठा होऊ शकेल असा विश्वास वाटतो.’