शिरूर: शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये सुरू असणारी लढाई आणखीन तीव्र होताना दिसत आहे. अमोल कोल्हे हे गेल्या पाच वर्षात मतदार संघामध्ये फिरकले नाहीत, याबद्दलची नाराजी जागोजागी दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये कोल्हे प्रचारासाठी गेल्यानंतर नागरिकांकडून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार देखील केला जातो आहे. आता शिरूर शहरामध्ये झळकलेल्या बॅनर्समुळे चर्चेला उधाण आल आहे.
2019 आली आढळराव पाटील यांचा पराभव करत अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. मात्र खासदार झाल्यानंतर कोल्हे हे मतदारसंघात लोकांपासून दूर झाले, गेल्या पाच वर्षात बहुतांश गावांमध्ये ते फिरकलेच नाहीत, असा आरोप केला जात आहे. आज शिरूर शहरामध्ये अनेक चौकांत कोल्हे यांना प्रश्न विचारणारे बॅनर्स झळकले आहेत. “आम्हा शिरुरकरांची मागणी आहे. तुम्ही पाच वर्षात शिरुर शहरासाठी काय केले? कृपा करुन सांगा?” असा मजकूर संबंधित बॅनर्सवर छापण्यात आला आहे.
दरम्यान, “कोल्हे साहेब पाच वर्षात तुम्ही दुसऱ्यांदा शिरुर शहरात मत मागायला आले, पण शिरुर शहरातल्या लोकांना पाच वर्षात एक रुपयाचा तुम्ही निधी दिला नाही, आम्ही कस काय मतदान करणार तुम्हाला ते सांगा?” अशा आशयाचे बॅनर देखील अनेक ठिकाणी झळकले आहेत. संबंधित बॅनरच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांना गेल्या पाच वर्षातील कामांचा हिशोब मागितला जात आहे. तसेच निवडून आल्यानंतर मतदार संघात फिरकले नसल्याचा सवालही केला जात आहे.