पुणे : जशी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे तसा प्रचाराला रंग चढत आहे. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना रंगत आहे. महायुतीच्या सर्व पक्षांकडून मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार जोमाने सुरु आहे. पुणेकरांचा तसा प्रतिसादही आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये पुण्यात बिघाडी पुन्हा एकदा समोर आली आहे.
महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सभेवरुन पुणे काँग्रेस आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद झाल्याचा पहायला मिळाला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवा नेते आदित्य ठाकरे यांची कोथरूडमध्ये सभा घेण्यावरून हा वाद झाला असल्याची माहिती आहे. कोथरुडमध्ये सभा घेतली तर येत्या काळात विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कोथरुडच्या जागेची मागणी होणार, अशी शक्यता असल्याने कोथरुडमध्ये सभा घेण्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद झाला आहे.
महाविकास आघाडीकडून सध्या रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी किंवा रोड शोसाठी मोठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी रोज बैठका घेऊन निर्णय घेतले जात आहे. मात्र याच बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये धूसफूस होत असल्याचं चित्र आहे. सगळ्या सभा किंवा रोड शो फक्त धंगेकरांच्या प्रचारासाठीच नाही तर येत्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीची गणितं समोर ठेवून सभेचं किंवा रोड शोचं आयोजन करण्यात येत आहे.
धंगेकरांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुण्याची ठाकरे गटाने विधानसभेसाठी कसबा देण्याची मागणी केली होती. जर कसबा दिला तरच रवींद्र धंगेकरांचा प्रकार करु, असा आक्रमक पावित्रा ठाकरे गटाने घेतला होता. कसबा विधानसभा मतदारसंघ देण्याचे आश्वासन दिल्यानंतरच प्रचारात सहभागी होणार असल्याचे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर ठाकरे गट रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात उतरले. पण आता महाविकास आघाडीमधील या वादाचे लोकसभा निवडणुकीत काय परिणाम होतील? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी; मोदींच्या विशेष पथकाकडून सभास्थळाची पाहणी
-पुणे तिथे काय उणे! नोकरीला लाथ मारत, बॉसला दिली खुन्नस; ढोला-ताशा वाजवत जल्लोषात कंपनीतून एक्झिट
-‘केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार’; सुनेत्रा पवारांचं जनतेला आवाहन
-“पुणेकर फार चोखंदळ, सहसा कोणाला डोक्यावर घेत नाहीत पण ४ जूनचा निकाल पुणेकरांनी कालच दाखवून दिला”
-“विद्यमान खासदार गल्ली फिरत नाहीत, पण ते विसरलेत की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवतात”