पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. शिरुर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात तुफान कलगितुरा रंगला आहे. त्यातच ‘शिरूर लोकसभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार होते’, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला होता. त्यानंतर आता शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
‘अमोल कोल्हे यांचा दावा म्हणजे बालिशपणा आहे. त्यांनी अज्ञानातून अशी वक्तव्य करू नयेत”, असा सल्ला आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना दिला आहे. शिवाजी आढळराव पाटील हे मंचर येथे पत्रकारांशी बोलत होते.
‘शिरूर लोकसभेसाठी छगन भुजबळ यांना उभं करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात होतं. मात्र, छगन भुजबळ यांनी नकार दिल्यानेच बेडूक उड्या घेऊन राष्ट्रवादीत आलेले शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली’ असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. यावर शिवाजी आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
“अमोल कोल्हे यांना संजय राऊत यांच्यासारखी काहीही बिन बुडाची विधानं करण्याची सवय लागली आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची उमेदवारी कशी जाहीर करतील? अमोल कोल्हे यांनी अज्ञानातून अशी बालिश विधाने करू नयेत. संजय राऊत यांच्यासोबत राहिल्याने ते काहीही बडबड करत आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःवर संयम ठेवावा”, असा सल्ला आढळराव पाटलांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“पुण्यात आता ‘मुळशी पॅटर्न’ नाही कर ‘कायद्याचा पॅटर्न’ चालणार”; अमितेश कुमारांचा गुंडांना इशारा
-एप्रिल महिन्यातही उष्णतेच्या लाटा कायम; पुढच्या ५ दिवसात आणखी पारा वाढण्याची शक्यता
-“पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार”- मुरलीधर मोहोळ
-‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेतील विकीचा नवा लूक पाहिला का?
-“मी शेतकऱ्यांची मुलगी अन् बायको, शेतकऱ्यांची कळकळ मला समजते, तुमच्या प्रश्नांसाठी मी कायम लढेन”