पुणे : लोकसभा निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू असून भाजप, काँग्रेस तसेच इतर राजकीय पक्षांकडून मोठ्या सभांचे आयोजन केले जात आहे. निवडणूक मध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी भविष्यात आपले सरकार आल्यास काय काम करणार यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो. मोदीची गॅरंटी म्हणत भाजपकडून त्यांचे संकल्प पत्र जाहीर करण्यात आले. तर काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत अनेक मुद्द्यांना हात घातला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेल्या एका घोषणेने मात्र भाजपने टीकेची झोड उडवली आहे. सामान्य नागरिकांच्या संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
देशातील जाती, उपजातींच्या सामाजिक, आर्थिक स्थितीची गणना करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रम राबविला जाणार असून त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर पुढील कार्यवाहीचा दिशा मजबूत केली जाईल, असे काँग्रेसच्या २०२४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. या देशात बहुसंख्यवादाला थारा नाही, असेही काँग्रेसने म्हटले असून अल्पसंख्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक लाभ, सार्वजनिक रोजगार, कौशल्य विकास, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रांत अधिक संधी देण्याची हमी काँग्रेसने दिली असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेसच्या जाहीरनामात करण्यात आलेल्या दाव्यांवर सडकून टीका केली आहे. “देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे राजकारण करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून गेली असून, संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे”, असे आवाहन केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केले. देशातील साधनसंपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्यांकांचा, म्हणजे मुस्लिमांचा आहे, असा दावा २००६ मध्येच तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केला होता. आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरीबांकडील संपत्ती हिरावून घेतली जाईल, असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.
राजस्थानमधील बसवारा येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काँग्रेसचा हा कट उघड केल्यामुळे काँग्रेस आता भयभीत झाली असून त्यांनी थटथयाट सुरू केला आहे. मात्र, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच देशातील दलित, मागासवर्गीय, ओबीसी समाज विकासापासून वंचित राहिला असून केवळ अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी काँग्रेसने या समाजाची कायम उपेक्षा केली आहे, असा आरोपही उपाध्ये यांनी केला. याउलट, देशाच्या विकासाची फळे समाजाच्या प्रत्येक स्तरावरील अखेरच्या व्यक्तिपर्यंत पोहोचली पाहिजेत, सरकारच्या प्रत्येक योजनेचा संपूर्ण लाभ खऱ्या लाभार्थीला मिळाला पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला सक्षमतेच्या समान संधी मिळाल्या पाहिजेत, यावर मोदी सरकारने नेहमीच भर दिला आहे. अंत्योदयाच्या संकल्पनेवर भारतीय जनता पार्टीची श्रद्धा असून अंत्योदयाच्या नीतीवरच पक्षाची वाटचाल सुरू असल्याने मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत आखलेल्या प्रत्येक योजनेचे लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहेत, असा दावाही उपाध्ये यांनी केला.
महत्वाच्या बातम्या-
-राज ठाकरे अजितदादांसाठी मैदान गाजवणार; बारामतीमध्ये होणार भव्य सभा
-…म्हणून पंतप्रधान मोदींची सभा एस. पी. मैदानावर नाही तर शहरातील ‘या’ मैदानावर होणार
-ससूनमधील मद्य पार्टी करणाऱ्या डॉक्टरांचे फोटो दाखवत अजित पवारांनी काढले वाभाडे; तरीही कारवाई नाहीच
-शिखर बँक प्रकरणात मोठी अपडेट, सुनेत्रा पवारांना मिळाला दिलासा!
-पुरंदरमध्ये अजित पवारांची ताकद आणखीन वाढली, ‘या‘ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश