नारायणगाव: आज मी शेतकरीपुत्र आहे म्हणून खासदार अमोल कोल्हे सगळीकडे सांगतात, परंतु निवडणुकीच्या सहा महिने अगोदर गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून मला शेतकऱ्यांबाबत फार कळवळा आहे, असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. जनता अशा गोष्टींना आता बधणार नसून त्यांचा खरा चेहरा सर्वांनी ओळखला आहे. गेल्या पाच वर्षात ते मतदारसंघात कधी फिरकलेच नाहीत. संपूर्ण मतदारसंघ जाऊद्या पण त्यांच्या नारायणगाव येथील कार्यालयातील त्यांचे सचिवदेखील लोकांशी नीट बोलत नाहीत, असा घणाघात जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केला आहे. निमगाव सावा परिसरामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित कोपरा सभेत पवार बोलत होते.
अमोल कोल्हे यांनी आता निष्ठेच्या गप्पा मारू नयेत, अजित पवारांकडून लोकसभेचे उमेदवारी मिळणार नाही, म्हणून ते पुन्हा शरद पवार यांच्याकडे गेले आणि आता निष्ठेच्या गप्पा मारू लागले आहेत. मधल्या काळात ते भाजपाच्यादेखील संपर्कात होते, त्यामुळे त्यांच्या या निष्ठा फसव्या आहेत. २०१९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जिवाचे रान करून अमोल कोल्हे यांना निवडून आणले. आता मात्र सोयीनुसार ते सगळ्यांना विसरले, अशी टीकाही पवार यांनी केली आहे.
दरम्यान, पराभव होऊन देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये सामान्य माणसाला आधार दिला. गोरगरिबांच्या दुःखात ते सहभागी झाले. विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडून गेल्यावर गायब झाले ते मतदारसंघात परत आलेच नाही. त्यामुळे अमोल कोल्हे यांना निवडून द्यायला नको होतं, आमची चूक झाली अशी जनताच म्हणत असल्याचेही पवार म्हणाले.