खडकवासला: बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सात मे रोजी मतदान पार पडणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील पूर्ण झालेली आहे. पवार घराण्यामध्ये इतिहासात पहिल्यांदाच फूट पडत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या आमने सामने आलेल्या आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शब्दबाण सोडण्याची एकही संधी सोडली जातं नाहीये. आज खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनील पवार यांच्या खडकवासला मतदारसंघातील निवडणूक कचेरीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आल. यावेळी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. विरोधी पक्षाचा खासदार निवडून आल्यास तो फक्त भाषण करण्याचं काम करू शकेल. केंद्रातून मोठा निधी आणू शकणार नाही, असा टोला अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
महाराष्ट्राने जर एखादी जबाबदारी स्वीकारली तर ती निभवण्यात महाराष्ट्र कधीच कमी पडत नाही. आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांच्या मागे खासदारांचं पाठबळ उभं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि आपण ती जबाबदारी निश्चितपणे पार पाडू अशी खात्री देखील अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.