पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच शिरुर लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याच चांगलीच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. ‘अमोल कोल्हे हे महागद्दार’ असल्याचा आरोप दिलीप मोहिते पाटलांनी केला आहे. त्यावर ‘महागाईने जनता, शेतकरी त्रस्त असताना कारवायांपासून वाचण्यासाठी त्याच्याच मांडीवर जाऊन बसले त्यांचीच पालखी वाहायची याला महागद्दार म्हणतात’, असं कोल्हे मोहितेंना म्हणाले आहेत.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडच्या विधानसभा मतदारसंघातील अनेेक गावांमध्ये दौरा केला आहे. यावेळी आमदार दिलीप मोहिते हे अमोल कोल्हे यांना महागद्दार म्हणाले आहे. ‘आढळराव पाटील यांनी रस्ते, महामार्ग, बैलगाडा शर्यतीच्या परवानगीसाठी तसेच अन्य केलेली कामेच अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कार्यअहवालात दाखविली आहेत. कामांचे श्रेय लाटणे म्हणजे एक प्रकारची चोरीच नाही का?, असेही दिलीप मोहिते म्हणाले आहेत. दिलीप मोहितेंच्या टीकेला उत्तर देताना अमोल कोल्हेही आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत.
अमोल कोल्हे काय म्हणाले?
“मोहिते यांच्या वयाचा, अनुभवाचा मान ठेवून प्रामाणिकपणे सांगतो की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम भाजपने केले आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी ८३ टक्के सुशिक्षितांना बेरोजगार केले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भाजप मंत्र्यांचा पोरगा चिरडतो, पेट्रोल शंभरीपार तर गॅस हजारच्या पार जातो. याला गद्दारी म्हणतात”
“ही गद्दारी उघड्या डोळ्याने दिसत असतानासुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी वाहायची, याला महागद्दारी म्हणतात. इतिहासातील हंबीरराव मोहिते खंबीर होते. हे मोहिते महागद्दार आहेत. केवळ कुठल्यातरी कारवाईपासून वाचण्यासाठी महागद्दारीचा आरोप करण्याची लाचारी वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, अशी माझी भावना आहे”, असे अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहितेंना आक्रमक उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार ‘कचाकचा’ शब्दावरुन झाले ट्रोल; स्पष्टीकरण देत म्हणाले, ‘मी ते वक्तव्य….’
-आयुष्यात सकारात्मक बदल करण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारचा उपदेश नक्की वाचा…
-अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; पहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?
-“४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” अजित पवारांचा तिखट सवाल