पुणे : महायुतीचे मावळ लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेलमध्ये महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर हे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत म्हणाले की, “स्वतःच्या खासदारकीची पर्वा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या श्रीरंग बारणे यांना विक्रमी मताधिक्याने तिसऱ्यांदा संसदेत निवडून पाठवूयात.”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच देशाचा विकास होईल. ‘सब का साथ, सब का विकास,’ या मोदींच्या घोषणेवर विश्वास ठेवून खासदार बारणे यांनी ठाम भूमिका घेतली. मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याची संपूर्ण जगाला खात्री आहे. पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवा आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य चिंचवडपेक्षा एका मताने तरी जास्त असले पाहिजे”, असं प्रशांत ठाकूर म्हणाले आहेत.
“जगात भारताची मान उंचावणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मावळच्या जनतेमुळे मला मिळाली आहे. रायगडच्या जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. त्यामुळे कोणताही राजकीय दृष्टिकोन न ठेवता मी कामाचा ठसा उमटवू शकलो. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे आम्हाला अडीच वर्षे बाजूला राहावे लागले, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार असणारी शिवसेना पुढे नेण्याचा निर्णय आपण घेतला”, असं श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati Lok Sabha | ‘मूळचा पवार आणि बाहेरुन आलेला पवार…’; अजितदादांना काकांचं खुमासदार शैलीत
-शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका