बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार आडनाव दिसेल तिथे मतदान करा, असं आवाहन बारामतीकरांना केलं होतं. त्याचबरोबर अजित पवारांनी सध्या त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या भावांनाही इशारा दिला होता. मी फार तोलून मापून बोलतोय, मी तोंड उघडलं तर तुम्हाला मग काही बोलता येणार नाही, असं अजित पवार बारामती मध्ये बोलले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवारांनी सडतोड उत्तर दिलं आहे.
“तुम्ही आधी साहेबांना मतदान केलं, त्यानंतर मुलाला म्हणजेच मला मतदान केलं. नंतर मुलीला मतदान केलं. आता सुनेला मतदान करा म्हणजे तुम्हाला पवारांना मतदान केल्याचं समाधान मिळेल”, असे अजित पवार म्हणाले होते. ‘अजित पवार म्हणतात पवार आडनावाला मतं द्या चुकीचं काय? एक गोष्ट लक्षात घ्या दोन गोष्टी असतात, एक मूळ पवार दुसरा बाहेरुन आलेला पवार’ असं म्हणत शरद पवारांनी सणसणीत उत्तर दिलं आहे.
“निवडणूक आल्यानंतर माझ्या कुटुंबातले सगळे लोक प्रचारात उतरतात. माझी निवडणूक असो, अजितची निवडणूक असो किंवा सुप्रियाची निवडणूक असो. आमच्या कुटुंबातले घटक असतात. त्यामुळे अजित पवार जे म्हणाले की, त्यांच्या वेळी प्रचाराला कुणी गेलं नाही ते काही खरं नाही. लोकांच्यात जातात, भूमिका मांडतात. लोकांचा सहभाग निवडणुकीत कसा होईल हे पाहतात. माझ्या कुटुंबातले जे घटक आहेत त्यांचे व्यवसाय हे सगळ्यांना माहीत आहेत. अजित पवार काय म्हणतात त्याची चिंता आम्हाला नाही”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Summer Skin Care Tips: वाढत्या उन्हामुळे त्वचेवर टॅनिग झालंय! करा ‘हे’ घरगुती उपाय