पुणे : देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पावसाळा पूर्व कामांतर्गत नालेसफाई कामाला सुरवात झाली आहे. ही कामे १० मे पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त, प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. पुणे महापालिकेकडून दरवर्षी पावसाळा पूर्व कमांतर्गत शहरातील सर्व नाले, ओढे, पावसाळी गटारे, वाहिन्यांची साफसफाई केली जाते. पण आता ही कामे पावसाळा तोंडावर आला तरी सुरुच असल्याचं चित्र गेले काही वर्षे सुरु आहे.
नालेसफाईची कामे उशिरा सुरू होत असल्याने आणि ती रखडल्याने वेळोवेळी या कामांना मुदतवाढ द्यावी लागली असल्याचाही प्रकार अनेकदा समोर आला आहे. कागदोपत्री कामे केल्याचे दाखवून ठेकेदारांकडून पैसे लुबाडले जातात, पावसाळ्यात अनेक भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडल्याने महापालिकेला अनेकवेळा टीकेला सामोरे जावे लागले आहे.
या पार्श्वभूमीवर यावेळी लवकर नालेसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लक्षात घेऊन निविदा प्रक्रिया लवकर राबविण्यात आली. पावसाळा पुर्वची कामे संथ गतीने सुरु असतील तर मुदतीत नालेसफाईची कामे होणार का? आणि याबाबतची निविदा ४५ टक्के कमी दराने आल्याने कामांच्या गुणवत्तेबाबतचा प्रश्न कायम राहणार आहे.
सध्या शहरातील नालेसफाईचं काम सुरु असलं तरीही त्या कामांचा वेग वाढलेला दिसत नाही. पावसाळी गटारांची स्वच्छता, नाल्यांची सफाई ही कामे सध्या संथ गतीनेच सुरु आहेत. मात्र कामांचा वेग वाढेल असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ही सर्व कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने संबंधित विभागांना दिल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-तरुणाईसह ज्येष्ठांशी “सोशल कनेक्ट” मोहोळांच्या हायटेक प्रचार तंत्राची राज्यात चर्चा
-सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; सुप्रिया सुळेंनी केली कारवाईची मागणी
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! धंगेकरांचा प्रचार थांबवा, नेत्यांच्या शिवसैनिकांना सूचना
-“त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते तुमचा काय विकास करणार?”; अजित पवारांचा खोचक सवाल