पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून होणाऱ्या उमेदवारीला आता पूर्णविरोध मावळला आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आढळराव पाटील यांनी केला. लांडे यांची नाराजी दूर करण्यात आढळरावांना यश आल्याने त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. एका बाजूला भाजपचे आमदार महेश लांडगे तर दुसऱ्या बजुला विलास लांडे यांची ताकद सोबत आल्याने भोसरीतून आढळरावांना मोठे मताधिक्य मिळेल ,असे राजकीय गणित जाणकारांकडून मांडण्यात येत आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी विलास लांडे हे आग्रही होते. दरम्यानच्या काळात उमेदवारीवरून राजकीय घमासान झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाबत मतदारसंघ विजयी होण्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी देखील बहाल करण्यात आली. पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयामुळे लांडे नाराज झाले. उमेदवारी आढळरावांना जाहीर झाल्यापासून ते राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते. माध्यमांना त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच राजकीय सार्वजनिक कार्यक्रमांना दांडी मारण्यास त्यांनी सुरुवात केली.
भोसरी विधानसभेत तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. या मतदारसंघात असणारे विलास लांडे हे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. लांडे नाराज झाले तर त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो याची जाणीव आढळराव पाटील यांना आहे. त्यामुळे त्यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविलयातील कार्यालयात जाऊन लांडे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना लांडे यांची नाराजी दूर झाल्याचे नरेटिव्ह तयार करण्याचे काम आढळराव पाटील यांनी केले. सोशल मीडियावर देखील लांडे आणि आढळराव यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ही चर्चा आढळरावांना सकारात्मक ठरेल असे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो पाहणे रंगतदार ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभेच्या लगीनघाईत व्हायरल झाली ‘ती‘ पत्रिका! पुण्याच्या राजकारणात जोरदार चर्चा
-मोदींच्या विकासाच्या कामावर नागरिकांना विश्वास, पुणेकरांची मन आम्ही जिंकली आहेत – मोहोळ