पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज भाजपकडून “हर घर मोदी का परिवार” अभियान राबवण्यात आले. या माध्यमातून शहरभरातील जवळपास दहा हजार कार्यकर्ते हे दहा लाख मतदारांपर्यंत पोहचणार असल्याचं भाजपकडून जाहीर करण्यात आलं होत. कसबा विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी कसब्यातून पन्नास हजारांचे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“कसबा मतदारसंघात एक हजार कार्यकर्ते हे घरोघरी जाऊन हर घर मोदी का अभियान हे राबवणार आहेत. सकाळी सात वाजल्यापासून सर्वांनी नागरिकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. कसब्यातून आम्ही उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना किमान ५० हजारांचे मताधिक्य देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अबकी पार ४०० पारचा नारा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने कामाला लागला आहे” असं हेमंत रासने यावेळी म्हणाले.
पुणे लोकसभा मतदार संघात भाजपचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये लढाई होत आहे. धंगेकर हे स्वतः कसब्याचे आमदार असल्याने येथून अधिकची मते मिळवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र दुसरीकडे पोटनिवडणुकीतील पराभवाला बाजूला सारत रासने यांच्यासह मतदारसंघातील भाजप पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. आज जाहीर कार्यक्रमात रासने यांनी मोहोळ यांना पन्नास हजारांचे मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केल्याने येणाऱ्या काळामध्ये कसब्यात रंगतदार लढाई पाहायला मिळू शकते