पुणे : राज्यासह उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. दिवसभर उन्हाच्या कडाक्याने जनता हैराण झाली आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्याने उष्माघाताच्या समस्यांचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात तब्बल ४१ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातही उन्हाचा प्रचंड कडाका आहे. पुण्यात ३ उष्माघाताचे रुग्ण सापडले आहेत. उन्हाचा तडाखा काही कमी होत नाही त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आरोग्य विभागाने वर्तवला आहे. राज्यात गेल्या वर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उष्माघाताने २२ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात यंदा उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद नाही.
या जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णांची नोंद
राज्यभरात १ मार्च ते ४ एप्रिल या दिवसांत सर्वाधिक उष्णता जाणवली असून याच कालावधीत उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे बुलढाणा जिल्ह्यात अढळले आहेत. बुलढाण्यात ५ अमरावती आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येकी ४ रुग्ण सापडले आहेत. पुणे, नाशिक, ठाणे येथे प्रत्येक ३ रुग्ण तर अहमदनगर, बीड, परभणी, रायगड, सोलापूरमध्ये प्रत्येकी २ रुग्ण सापडले आहेत. अकोला, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, नांदेड, रत्नागिरी, सातारा प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाने सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांना त्याबाबत उपचाराचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयांमध्ये ठेवण्यासही सांगण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Election Commission इन ॲक्शन मोड! ओपिनियन आणि एक्झिट पोलबद्दल मोठा निर्णय
-“माझ्या बारशात जेवलेल्या लोकांबद्दल मी काय बोलू?, पण आता मी बच्चा राहिलो नाही” -उदयनराजे भोसले