पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पुण्याचे माजी महापौप मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. भाजपकडून पुणे शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असून मोहोळ यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपच्या वर्धापन दिनी ‘घर चलो अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील जवळपास दहा ते बारा लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन भाजपकडून आखण्यात आला आहे.
६ एप्रिलला भाजपचा वर्धापन दिन असून या दिवशी पुणे शहर भाजपकडून मोहोळ यांच्या प्रचारासाठी ३ लाख घरांमध्ये विशेष पत्रक वाटली जाणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांसारखे बडे नेते देखील या अभियानात सहभागी होणार आहेत. पुण्यातील महायुतीचे सर्व स्थानिक आमदार देखील घरोघरी जाऊन मोहोळांच्या प्रचाराचं पत्रक वाटणार आहेत.
भाजपच्या या अभियानातून भाजपचे नेते, आमदार, कार्यकर्ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणार असून शहरात साधारणपणे १० ते १२ लाख नागरीकांना हे पत्रक वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
“वर्षानुवर्षे पुणेकर हे भाजपलाच मतदान करतात. आमच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.तसेच अजितदादांसारखं तगडं नेतृत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इतकं चांगलं काम करत आहेत. आर.पी.आय.ची ताकद आमच्यासोबत त्यामुळे हे सगळे एकत्रित मिळून मुरलीधर मोहोळ यांना खासदार करतील. मोहोळ यांना मोठे मताधिक्य राहील. २० आणि २१ एप्रिलनंतर पुणे लोकसभेचा फॉर्म भरला जाईल. महायुतीचे सर्व नेते मोहोळ यांचा फॉर्म भरायला उपस्थित राहतील”, असंही धीरज घाटे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-निवडणूक आयोगाने घातल्या खर्चाच्या मर्यादा; प्रचारात उमेदवारांना महागड्या गाड्या वापरणं पडणार महागात
-‘काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका