पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वत्र प्रचाराचं वातावरण आहे. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचे दर निश्चित करुन दिले आहेत. या नियमांचे पालन उमेदवारांना काटेकोरपणे करावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना निवडणूक खर्चाला ताळेबंद ठेवताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा आखून दिली आहे. यापूर्वी निवडणुकीच्या उमेदवाराला ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा होती. मात्र यावेळी यामध्ये वाढ करुन ती ९५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रत्येक उमेदावाराला फक्त ९५ लाख रुपयांमध्येच निवडणुकीचा सर्व खर्च करावा लागणार आहे.
या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठा कालावधी मिळाला आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं उमेदवारांना अवघड जाणार आहे. प्रचार करताना उमेदवाराने कार्यकर्त्यांना चहा दिल्यास प्रतिचहा २० रुपये आणि कॉफीसाठी २५ रुपये निवडणूक खर्चात नोंदवले आहे. उमेवारांच्या, कार्यकर्त्यांच्या नाश्त्यासाठी ३० रुपये आणि वडापावसाठी प्रतिव्यक्ती २५ रुपये खर्च करू शकतात.
प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांचादेखील निवडणूक आयोगाने प्रचार खर्चामध्ये विचार केला आहे. विविध प्रकारच्या प्रवासी वाहनांच्या वापरामध्ये मर्सिडीजचा दर प्रति दिन २८ हजार रुपये निश्चित केला आहे. प्रचारासाठी रिक्षा, साउंड सिस्टिमसह दुचाकी, टाटा मॅजिक, टेम्पो ट्रॅव्हलर, २५ ते ५० प्रवासी क्षमतेच्या बसचे दर दिले आहेत.
रिक्षाला १ हजार २५० पन्नास इतका दर निश्चित करण्यात आला आहे. तर सर्वाधिक कमी दर दुचाकीचा असून, प्रतिदिन ५०० रुपये दर आहे. एसयूव्ही, स्कॉर्पिओ, तवेरा यांच्यासाठी प्रत्येकी ५ हजार १२५ रुपये, इनोव्हा, झायलोसाठी प्रत्येकी ५ हजार ८८८ रुपये, स्कोडा ५ हजार २०० रुपये आणि बीएमडब्ल्यूचा एका दिवसाचा दर १८ हजार ३०० रुपये निश्चित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘काँग्रेसची गॅरंटी म्हणजे चायना मालासारखीच‘; भाजप नेत्याची खरमरीत टीका
-‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे