पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि महायुतीकडून भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत होणार आहे. मात्र आता वंचित बहुजन आघडीने उमेदवार उभा करण्याची तयारी सुरु केली आहे. पहिल्यापासून इच्छुक असणारे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला असला तरीही वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा देण्यास विरोध केला आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजनच्या उमेदवाराने तब्बल ६५ हजार मते घेतली होती. या निवडणुकीतही वंचितमुळे मतांचे विभाजन होऊन याचे परिणाम होतील म्हणून वंचितचा आतापासूनच महाविकास आघाडीने धसका घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वसंत मोरे यांना पाठिंबा देण्यास स्पष्ट शब्दात विरोध केला आहे.
वसंत मोरे हे पहिल्यापासून पुणे लोकसभसाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी मनसेला जय महाराष्ट्र केलं. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र महाविकास आघाडीकडून धंगेकरांना उमेदवारी मिळाली. वसंत मोरेंनी आपला मोर्चा मराठा आंदोलन समितीकडे वळवला मात्र तिथेही काही सूत जुळले नाही म्हणून वसंत मोरे यांनी वंचित बहुजनचा हात धरला.
वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याचा आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राज्य आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत मोरे यांना पाठिंबा देण्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याचं समोर आले आहे. मोरेंना पाठिंबा देण्याऐवजी पक्षाचा उमेदवार उभा करावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. त्यानुसार आता वंचितकडून उमेदवार निश्चित बाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: गुरवारी पाणी पुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेकडून आवाहन
-आचारसंहितेचा भंग होतोय? निवडणूक आयोगाने उचलले कठोर पाऊल! अशी नोंदवू शकता तक्रार