मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा उमेदवार अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी वरवधूला शुभआशीर्वाद देताना कोल्हे यांनी राष्ट्रवादी पक्षफुटीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या चिन्हांची सांगड घालत एका प्रकारे आपला प्रचारच केला. लग्नसोहळ्याला येण्यासाठी कोल्हे यांना उशीर झाला होता. हाच सदर्भ घेत वधू-वरांना आशीर्वाद देताना ‘घड्याळ निघून गेल्याने वेळ जुळत नाहीये. पण पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी’, असं अमोल कोल्हे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अमोल कोल्हेंना राजगुरुनगरमधील योगदानाबाबत प्रश्न केला आहे.
“प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलंच पाहिजे असं काही नाही. आता एका अॅक्टरसोबत सामना करायचा आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की, त्याचं स्क्रिप्ट हे दुसरं कोणाचं तरी असतं. असं व्यवहारीक जीवनात सगळं असंच बोलणं शक्य नाही. सगळीकडे रंगमंंच आहे असं बोलतात पण मागचं काय? राजगुरुनगरसाठी तुम्ही काय केलं. कोरोना काळातील काय अडचणी होत्या, कोणाला काही अडचणी आहेत का? कोणाची भेट घेतली का? कोणाची ओळख आहे का? सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांना काय अडचणी आल्या? मध्यंतरी पोलिसांनी त्रास दिला हे कोणी पाहिलं नाही, मात्र मीच प्रश्न सोडवला”, असं दिलीप मोहिते यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अमोल कोल्हे यांचे राजगुरुनगरसाठी योगदान काय? असा प्रश्न उपस्थित करत मोहिते यांनी टीका केली आहे. आता शिरुरच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मोदीजींचे काम मतदारांपर्यंत पोहचवा! मोहोळांसाठी चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका
-बारामतीमध्ये रंगणार हायव्होल्टेज ड्रामा; सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा
-शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचे शिलेदार केले जाहीर; पहा कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
-राष्ट्रवादीच्या गोट्यातून रासपला परभणीची जागा; महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर