शिरूर: संपूर्ण महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघातील लढती चर्चिल्या जात आहेत. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार आणि शिरूर मतदारसंघात अभिनेते आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे (शरद पवार गट) यांच्या समोर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांचे आव्हान असणार आहे. दोन्ही बाजूंकडून शिरूरमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे. यामध्ये विकासाच्या मुद्यांसोबतच विद्यमान खासदार मतदारसंघात फिरकले नसल्याची तक्रार सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. हीच गोष्ट अमोल कोल्हे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेले अमोल कोल्हे यांनी 2019 मध्ये साकारलेल्या मालिकेतील ऐतिहासिक भूमिकेचा त्यांना मोठा फायदा झाला. तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला. अभिनय क्षेत्रातील वलयामुळे प्रभावित होत नागरिकांना त्यांना साथ दिली, परंतु गेल्या पाच वर्षात मतदारसंघात त्यांचा संपर्क अत्यल्प असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. शिरूर मतदारसंघात ठोस विकासकाम देखील झाले नसल्याच चित्र आहे. मागील वेळी अनुकूल असणारी परिस्थिती आता तशी राहिलेली नाही. मतदारसंघात ते फारसे न फिरल्यामुळे त्याचा फटका त्यांना या निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्य नागरिकांपासून त्यांचे पदाधिकारी आणि नेत्यांना देखील कोल्हे भेटत नसल्यामुळे त्यांच्यावर असलेली नाराजी आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर प्रथम अमोल कोल्हे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते, त्यांना पाठिंबा देत मंत्रिमंडळाच्या शपथविधीलादेखील उपस्थित होते. नंतर त्यांनी ‘यू’ टर्न घेत संधी साधण्यासाठी शरद पवारांसोबत राहिले अशी देखील कुजबुज आहे.
निवडून दिल्यानंतर मतदारांना उपलब्ध न झालेले खासदार अगदी निवडणुकीच्या तोंडावर काही महिने मतदारसंघात येतात शेतकऱ्यांचे प्रश्न घेतात लोकसभेत भाषणबाजी करतात आणि मला शेतकऱ्यांची फार काळजी आहे असे भासवण्याचा प्रयत्न करतात,अशी चर्चा मतदारसंघात आहे. या उलट पराभवाचा फटका बसल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सातत्याने जनतेच्या संपर्कात राहत कामे मार्गी लावल्याच दिसत आहे. त्यामुळे विद्यमान खासदार मतदारसंघात न फिरल्याचा मुद्दा आढळराव पाटील यांच्यासाठी फायद्याचा ठरणार का हे निकालातून स्पष्ट होईल.