पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी पक्षातील पदाधिकारी, विविध समाज संघटना, पैलवान तसेच इतर क्षेत्रातील खेळाडू, सिनेसृष्टीतील कलाकार यांच्यासह पुणेकरांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आता मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली असून पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या बैठका घेऊन मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना केली आहे.
मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली असून शुक्रवारी महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, मंडल अध्यक्ष, विस्तारक सोशल मीडिया आणि आयटी सेल यांची बैठक घेतली. शनिवारी अनुसूचित जाती मोर्चा, झोपडपट्टी आघाडी, वैद्यकीय आघाडी, पर्यावरण आघाडी, उत्तर व दक्षिण भारतीय आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, सहकार, पायाभूत सुविधा, शिक्षक भटके विमुक्त आघाडी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला. तसेच, पदाधिकाऱ्यांच्या सूचना देखील जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोविड काळात मुरलीधर मोहोळ यांनी महापौर नात्याने पुणे शहरात केलेले काम फारच परिणामकारक होते. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे पुणे शहराने कोविडवर यशस्वी मात केली. पुणेकरांना याची जाणीव आहे. त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांना खासदार बनविण्यासाठी पुणेकर मतदान करणारच आहेत. पण तरीही कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे, अशा सूचना दिल्या.
या बैठकीला शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे लोकसभा निवडणूक प्रभारी श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रवी साळेगावकर यांच्या सह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी सर्वच आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुरलीधर मोहोळ विक्रमी मतांनी विजयी होतील, असा संकल्प व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीमध्ये रंगणार हायव्होल्टेज ड्रामा; सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा
-शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीचे शिलेदार केले जाहीर; पहा कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
-राष्ट्रवादीच्या गोट्यातून रासपला परभणीची जागा; महादेव जानकरांची उमेदवारी जाहीर
-…म्हणून विजय शिवतारे यांनी बारामतीच्या निवडणुकीतून माघार घेतली; स्पष्टच सांगितलं काय घडलं