पुणे : बॉलिवूड अभिनेता गोविंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करत ‘कलाकार हा कलाकार असतो. त्याचा अपमान करणाऱ्याला जनता धडा शिकवेल’, असे एकनाथ शिंदे असे म्हणाले आहेत. गोविंदा आहुजाला मुख्यमंत्र्यांनी लोकसभेसाठी संधी दिली. याचा आधार घेत शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना खडसावलं आहे.
“गेली काही वर्षे सातत्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीला लोकसभेत निवडून दिले. त्यानंतर शेलक्या शब्दांमध्ये जे कायम हिणवलं जात होतं. मग नाटक्या असेल, नौटंकी असेल आणि खरोखर मग प्रश्न पडतो. हिंदी सिनेसृष्टीतला सिनेस्टार आला तर मग त्यांचे स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करुन आपला जाज्वल्य इतिहास, खरा इतिहास पोहोचवणाऱ्या माझ्या सारख्याच्या बाबतीत मुख्यमंत्री शिदे यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आता ज्यांनी पक्ष बदलला ते सातत्याने अशी टीका टिप्पणी करतात.”, असंही अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवलं आहे.
‘गोविंदा एखादा खासदार होते तेव्हाचा त्यांची कामगिरी बघावी आणि मला थोडीशी पातळी सोडून ‘नाटक्या’ म्हणून कोणी हिणवत असेल तर त्यांनी २०१४ ते २०१९ मधील माझी संसदीय कामगिरी तपासून पहावी. पहिल्याच वेळी तब्बल ३ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर शिरूर मतदारसंघाचे अनेक प्रश्न हे मार्गी लावल्यानंतर कोण अशा पद्धतीने टीका करत असेल तर त्यातून ज्याची त्याची संस्कृती दिसते. यापलीकडे काय बोलणार?’ असं म्हणत अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, अमोल कोल्हे हे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांंमध्ये होणाऱ्या या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे तिथे काय उणे! ‘पाच वर्ष पक्ष सोडणार नाही, असं आश्वासन देणाऱ्यालाच मत’; पुण्यात झळकले बॅनर
-“ही बैठक सकारात्मक, येत्या ३ दिवसांत निर्णय होईल”; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मोरेंची प्रतिक्रया
-लोकसभा उमेदवारीवरून मोरे ‘वंचित‘ आता घेणार प्रकाश आंबेडरांची भेट
-श्रीरंग बारणे यांच्या हाती पुन्हा धनुष्यबाण; पण ठाकरेंच्या मशालीला शमवणार का?
-मावळात अखेर श्रीरंग बारणेच! शिवसेनेकडून आठ उमेदवारांची यादी जाहीर