पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांमध्ये नाराजीची लाट पसरल्याचं पहायला मिळतंय. माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आज पत्रकार परिषद घेत “निष्ठावंतांवर अन्याय करणारे शुक्राचार्य कोण आहेत? एका बाजूला राहुल गांधी न्याय यात्रा काढतात मात्र प्रामाणिक कार्यकर्त्यांवरच अन्याय होतोय” अशी भावना बागुल यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसमध्ये एक व्यक्ती एक पद हा फॉर्मुला पाळला जातो, मात्र आता आमदार असणाऱ्या व्यक्तीलाच लोकसभेची उमेदवारी देऊन काय साध्य केलं. ते आत्ताच पक्षात आले आमदारकी मिळवली आणि आता खासदारकीची उमेदवारी देण्यात आली. गेली 40-50 वर्षांपासून आम्ही पक्षामध्ये निष्ठावंत म्हणून काम करत आहोत आम्हाला का डावलले गेले? पक्षात येण्यापूर्वी त्यांनी (धंगेकर) काँग्रेसवर केलेल्या टीकेच्या व्हिडिओ क्लिप फिरल्यास अवघड होईल, असा प्रश्न आबा बागुल यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करू आज प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. आज किंवा उद्या काँग्रेस भावनात असणाऱ्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी कॅन्डल मार्च काढत प्रश्न विचारणार आहोत, की आता तरी आबा बागुल दिसतो की नाही, अशी उद्विग्न भावना बागुल यांनी व्यक्त केली.
कॅप्टनने पुढे येत निष्ठावंतांशी चर्चा करायला हवी होती. शहरातील अनेक पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी चर्चा केली गेली नाही. जर एकाच व्यक्तीला उमेदवारी द्यायची होती तर मग इच्छुकांचे अर्ज कशाला मागवले. घाईगडबडीत हा निर्णय घेतला गेला आहे, आम्ही शांतपणे हे बघायचं अशाने काँग्रेस चालणार नाही. उमेदवाराला निवडून आणण्याची प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. अन्यायाला वाचा फोडणे म्हणजे पक्षाच्या विरोधात जाणे असं होत नाही. मी अन्यायाला वाचा फोडणार कोणाच्याही चपला उचलणार नाही, असा इशारा यावेळी आबा बागुल यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धंगेकरांना उमेदवारी, वसंत मोरेंचं व्हॉट्स अॅप स्टेटस चर्चेत; ‘एकदा ठरलं की ठरलं’
-‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’; पंकजा मुंडेंचा विश्वास
-काँग्रेस अखेर ठरलं! आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर