पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आल्या असताना राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली राज्याचं राजकारण बदललं. त्यातच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात लढण्याचा विडा उचलला आहे. या पार्श्वभूमीवर विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघात दौरे करुन पवार घराण्यावर टीका केली आहे. यावरुन आता महायुतीमध्ये जुंपल्याचं पहायला मिळत आहे.
‘पवार कुटुंबानं पुण्यात कोणत्याही नेत्याला मोठं होऊ दिलं नाही. बारामतीचा सातबारा काय पवारांच्या नावावर आहे का? बारामतीची निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच. अजित पवारांना प्रचंड गुर्मी आहे’, अशा शब्दांत गेल्या काही दिवसांपासून विजय शिवतारेंनी थेट अजित पवारांवर आगपाखड करताना दिसत आहेत.
राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार म्हणजे काका-पुतण्या आमनेसामने भिडताना दिसत आहेत. बारामतीच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं. त्यातच शिवतारेंनी बारामतीमधून अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.
विजय शिवतारे यांनी २ दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यानंतरही बारामती उमेदवारीबाबत शिवतारे ठाम आहेत. शिवतारे यांच्या रुपात अजित पवार यांच्या विरोधात महायुतीतूनच मोठं आव्हान उभं राहिलं आहे. यावरुन अजित पवार गटाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शिंदेंच्या सेनेला निर्णावाणीचा इशारा दिला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही शिवतारे बारामती मतदारसंघात फिरुन वातावरण खराब करत आहेत. याचा अर्थ शिंदेंचं त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण नाही. शिवतारे महायुतीचा धर्म तोडत राहिले, तर शिवसेनेचा शिंदे गट ज्या ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये लढणार आहे, त्या त्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीदेखील महायुतीचा धर्म तोडू शकतात”, असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी दिला आहे.
“शिवतारेंकडून वारंवार अजित पवारांविरोधात टीकांचं सत्र सुरू आहे. महायुतीमधील वातावरण खराब होईल, असं कृत्य आम्हाला करायचं नाही. पण शिवतारेंच्या कृतीमुळे शिंदेंचे आदेश त्यांचेच नेते ऐकत नसल्याचा संदेश राज्यात जात आहे. पुरंदरच्या जनतेनं २०१९ मध्ये त्यांची जागा दाखवली आहे”, असंही आनंद परांजपे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“शिवतारेंमुळे महायुतीला तडा जातोय, त्यांनी अजितदादांची जाहीर मागावी, अन्यथा आम्ही….”
-‘श्रीनिवास पवारांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातोय’; युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया
-‘आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का?’ सुप्रिया सुळेंकडून श्रीनिवास पवारांची पाठराखण
-निवडणुकीत ब्लॅक मनीचा वापर होऊ नये म्हणून इनकम टॅक्सकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना