पुणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रामध्ये एकूण ५ टप्यात मतदान पार पडणार आहे. पुणे लोकसभेसाठी (Pune Loksabha) १३ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपकडून मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची उमेदवार जाहीर करण्यात आल्यानंतर आता पक्षांतर्गत नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी रेसमध्ये राहिलेले जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्यासह इतर नेत्यांच्या घरी जावून भेट घेत मोहोळ यांनी प्रचारात आघाडी घेतल्याच दिसत आहे.
निवडणूक आयोगाकडून निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच भाजपने मोहोळ यांची उमेदवारी घोषीत केली. मोहोळ यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पक्षांतंर्गत भेटीगाठींना प्राधान्य दिल्याने संघटना पातळीवर सर्वच घटक कार्यरत करण्याचा मोहोळ यांचा प्रयत्न आहे. पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांना मोहोळ यांचे राजकीय गुरु मानले जाते. आपल्याच तालमीतील पैलवान लोकसभेच्या आखाड्यात आल्याने शिरोळे यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले.
राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, भाजपाचे मा. अध्यक्ष योगेश गोगावले, माजी आमदार आमदार विजय काळे यांचीही त्यांनी घरी जात भेट घेतली. कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यामध्ये आजवर अनेकदा सुप्त संघर्ष पहायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच कोथरूडच्या असणाऱ्या मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागली तर आता याच भागाचे मोहोळ लोकसभेचे उमेदवार आहेत. . मात्र भाजपमध्ये व्यक्ती पेक्षा पक्षाला जास्त महत्व दिले जाते. खासदार कुलकर्णी मोहोळ हे घरी आल्यानंतर त्यांचे औक्षण करत विजयाचा संकल्प केला. मोहोळ आणि खा. कुलकर्णी एकत्र आल्याने याचा मोठा फायदा कोथरुड विधानसभेच्या मताधिक्यात होईल, अशी शक्यता राजकीय जाणकारांना वाटते.