पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यातच आता आज निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली आहे. आमदार निलेश लंके यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम आजही कायम राहिला आहे. निलेश लंके आज शरद पवारांसोबत मंचावर आले मात्र पक्षात प्रवेश केला नाही. त्यामुळे निलेश लंके यांना नेमकी भीती आहे की काय किंवा काय भीती आहे?, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
निलेश लंके लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटात जात असावेत, असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले होते. त्याप्रमाणे निलेश लंके आज पुण्यातील शरद पवार गटाच्या कार्यालयात पोहोचले. मात्र यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक लढविण्याबाबत किंवा शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी? असा प्रश्न विचारला असता “साहेब सांगतील तो आदेश”, असे सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केले आहे.
“मी शरद पवारांच्या विचारधारेबरोबरच”
“मी शरद पवारांच्या विचारधारेबरोबरच आहे. लहानपणापासून शरद पवारांच्या नेतृत्वाचा आणि विचारांचा मी चाहता आहे. कोरोना काळात मी शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले होते. ज्या काळात कुटुबांतील लोक एकमेकांना विचारत नव्हते. त्या काळात मी शरद पवार साहेबांच्या नावाने समाजसेवा करत होतो. त्याच काळात मला जे अनुभव आले. त्याआधारावर ‘मी अनुभवलेला कोविड’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते व्हावे, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी आज इथे आलो आहे.”
“माझी विचारधारा आणि पक्ष एकच”
विचारधारा एकच आहे, मग पक्षही एकच आहे, असा प्रश्न विचारला असता निलेश लंके म्हणाले की, “माझी विचारधारा आणि पक्ष एकच आहे. आजही माझ्या कार्यालयात शरद पवार यांचा फोटो आहे. माझ्या सोशल मीडियाच्या सर्व पोस्ट पाहा. त्यात कुठेही शरद पवारांच्या विरोधात पोस्ट दिसणार नाही. तसेच मी आज शरद पवार साहेबांच्या मंचावर असताना मी दुसऱ्या मंचावर कसा जाईल?” असंही सूचक वक्तव्य निलेश लंके यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विजय शिवतारेंनी केला प्रचाराचा श्रीगणेशा; कन्हेरीच्या मारुतीच्या चरणी नतमस्तक
-‘मावळचे पुढचे खासदार श्रीरंग बारणे हेच असणार’; उदय सामंत यांचा विश्वास
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचाराचा नारळ फुटला; कै. गिरीश बापटांच्या प्रतिमेला अभिवादन
-‘..तर आमदाराकी सोडावी लागेल’; अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा
-‘बारामतीचा विकास माझ्यासारखा कोणीच करू शकत नाही’; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद