बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून खासदार शरद पवार यांच्या सोबत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. अजित पवार यांनी लंकेंना थेट इशारा दिला आहे.
“निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये, अशी माझी त्यांना विनंती आणि आवाहन आहे. आमची कालच भेट झाली. मात्र, तसा निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना आमदारकी सोडावी लागेल. नाहीतर ते अपात्र होतील. पक्षाच्या विरोधी कोणती भूमिका घेतली तर पक्ष करावाई करु शकतो”, असे म्हणत अजित पवार यांनी निलेश लंकेंना शरद पवार पक्षात जाण्यापासून रोखले आहे.
बारामती लोकसभेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, ‘ज्यावेळी ४८ जागांचं वाटप होईल तेव्हा उमेदवार जाहीर करेल.’
‘मी अनुभवलेलं कोविड’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने निलेश लंके पुण्याकडे निघाले आहेत. त्यावेळी अनेक कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर जमले होते. त्यांच्या घरासमोर तुतारी वाजत होती. याबाबत लंके यांनी सूचक विधान केले आहे. “वेळ आणि काळच उमेदवार ठरवेल” असं निलेश लंके यावेळी म्हणाले आहेत. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास पवार उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. आता निलेश लंके यांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘बारामतीचा विकास माझ्यासारखा कोणीच करू शकत नाही’; अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद
-भाजपकडून मोहोळांना उमेदवारी जाहीर; जगदीश मुळीकांची ‘ती’ पोस्ट चर्चेत
-भाजपने तर डाव टाकला आता काँग्रेस काय खेळी खेळणार; मोहोळांना टक्कर देण्यासाठी कोणाला देणार उमेदवारी?
-आता वेल्हे तालुक्याचं नाव ‘राजगड’; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय