पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे आता ‘राजगड’ हे नाव करण्यात आले आहे. वेल्हे तालुक्यात राजगड आणि तोरणा किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आहे. मागील अनेक वर्षांपासून वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची ही मागणी होती.
वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेण्यात आला आहे. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
वेल्हे तालुक्याचे नामांतर करण्यासाठी तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव घेण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करण्यात आली होती. पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात आला होता. त्यानंतर आता अखेर वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे.
अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते असताना २७ एप्रिल २०२३ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी वेळोवेळी केलेली मागणी आज त्यांच्याच उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांचा वसंत मोरेंना फोन; भाजपमध्ये जाणार? मोरे म्हणाले, ‘मी माझा निर्णय..’
-“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”
-पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला
-वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; ‘या’ पक्षात प्रवेश करणार