पुणे : पक्षात नाराज असलेले वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनीदेखील धडाधड राजीनामे दिले. त्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र २ दिवसांत मी सगळं जाहीर करेन, असं वसंत मोरे राजीनामा देताना म्हणाले आहेत. वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता इतर पक्षातून मोरेंना फोन यायला लागले असल्याचं मोरे म्हणाले आहेत.
पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांचा फोन आल्याचं मोरेंनी सांगितलं आहे. मुरलीधर मोहोळांचा फोन आल्याने ते भाजपमध्ये जाणार की काय? असं दिसत आहे. मात्र वसंत मोरेंनी या सगळ्या शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. वसंत मोरे यांनी राजीनाम्यापूर्वी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट नंतर पक्षाचा राजीनामा, काँग्रेस नेत्यांनी मोरेंची घेतलेली भेट आणि आता मुरलीधर मोहोळ यांचा फोन या सर्व घडामोडींनंतर मोरेंची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वाचं लक्ष लागून आहे.
मुरलीधर मोहोळांचा फोन आल्यानंतर वसंत मोरेंना भाजपमध्ये जाणार का? या प्रश्नावर बोलताना वसंत मोरे म्हणाले, “भाजप हा मोठा पक्ष आहे. भाजप माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांना का बोलवतील? मी माझा निर्णय घेतला आहे आणि या निर्णयाशी मी ठाम आहे. पुढचा निर्णय नक्की दोन दिवसांत घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सगळ्या पक्षात सध्या लोकसभेसाठी उमेदवारांची मोठी रांग आहे. वेळ आली तर मी अपक्षदेखील लोकसभा निवडणूक लढवणार. मनसेत माघारी फिरुन मला साहेबांना फसवायचं नाही”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
“मी राजीनामा दिल्यावर अनेकांना दु:ख झालं. अनेक लोक मला मिळत असलेली वागणूक बघत होते. ते निरिक्षण करत होते. राजीनामा दिल्यावर काही वेळात मला मुरलीधर मोहोळांचा फोन आला. मुरलीधर मोहोळ आणि मी जुने चांगले मित्र आहोत. त्यामुळे मुरलीधर मोहोळांनी माझं सांत्वन करण्यासाठी फोन केला होता. तात्या तुझ्यासारख्या कार्यकर्त्यासोबत हे चुकीचं झालं, असं मोहोळ म्हणाले. मोहोळांनी मला संघटनेसाठी फोन नाही केला मित्र म्हणून फोन केला”, असं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”
-पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला
-वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; ‘या’ पक्षात प्रवेश करणार
-ईडीच्या १८ वर्षांतील कारवायांचा शरद पवारांनी वाचला पाढा; रोहित पवारांवर केलेल्या कारवाईवरून आक्रमक