पुणे : लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. सर्व पक्षांनी जोमाने तयारी सुरु आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची लढाई म्हणजे बारामती लोकसभेची निवडणूक. या मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्षांत एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या रुपाने जवळपास एकांगी निवडणूक पाहायला मिळाली.
येत्या निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत वेगळी रंगत पहायला मिळणार आहे. मात्र अशातच आता ही तिरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबाविरुद्ध दंड थोपटले आहेत. ‘बारामतीमधून आपण निवडणूक लढवणार म्हणजे लढवणार’, असा निर्धार विजय शिवतारे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
“गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो, काडी ओढायला. पण गाव वसवण्यासाठी अनेक हात लागतात. अजित पवारांनी उर्मट भाषा केली होती. पण मी त्यांना माफ केलं आहे. ते महायुतीत आले तेव्हा मी त्यांना जाऊन भेटलो. पण तरीही त्यांची गुर्मी तशीच होती. त्यांच्या उर्मटपणावर बारामती मतदारसंघात लोक म्हणाले की, ‘अजित पवार उर्मट आहे. त्यामुळे त्यांना आम्ही मत देणार नाही, सुप्रिया सुळेंना मत देणार. काही लोकांचं म्हणणं आहे एका बाजूला लांडगा आणि एका बाजूला वाघ आहे आम्ही मत कसं देऊ असा मतदारांचा प्रश्न आहे”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
“एखाद्याने चूक केली तर त्याला पश्चात्ताप तरी असतो. पण यांना तो पश्चात्तापही नाही. जणूकाही लोकांना फसवणे हा जन्मजात अधिकार असल्यासारखे हे वागत आहेत. इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केला आहे. या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल. या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे”, अशी टीका विजय शिवतारे यांनी यावेळी केली.
“२०१९च्या निवडणुकीत मी अजित पवारांच्या मुलाच्या विरुद्ध केलेला प्रचार राजकारणाचा भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. पण अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. मी तेव्हा आजारी होतो. त्यामुळे रुग्णवाहिकेत माझा पूर्ण प्रचार झाला. पण अजित पवारांनी तेव्हा म्हटलं की मरायला लागला आहात तर कशाला निवडणूक लढवताय? माझी गाडी कुणाची आहे, कुठल्या कंपनीची आहे वगैरे चौकशी करेपर्यंत अजित पवार खालच्या स्तरावर उतरले”, असंही शिवतारे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला
-वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; ‘या’ पक्षात प्रवेश करणार
-ईडीच्या १८ वर्षांतील कारवायांचा शरद पवारांनी वाचला पाढा; रोहित पवारांवर केलेल्या कारवाईवरून आक्रमक
-महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचं वक्तव्य; ‘जागावाटपाची प्राथमिक चर्चा झालीय तिन्ही पक्ष…’
-दिल्ली दरबारी महायुतीची महत्वाची बैठक; लोकसभेसाठी महायुतीकडून पुण्यात ‘या’ नावाला पसंती