पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरुरच्या उमेदवारीवरून चर्चा रंगली आहे. त्यातच आता शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची निश्चिती झाल्याची दिसून येत आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी आज मंचरमध्ये उपस्थित राहिले.
शिवाजी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले आणि नंतर पुन्हा अजित पवार यांच्यासोबतच एकाच गाडीत प्रवास केला. आढळराव पाटील आणि अजित पवार यांना एकत्र प्रवास केल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार मंचरमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आणि शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी आले असताना त्यांच्या स्वागतासाठी आढळराव पाटील उपस्थित होते. त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार याची सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे.
‘शिरुर लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या’, असे आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. यावेळी बोलताना अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला आहे.
“राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले अन मग राजीनामा दिला, पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार (अमोल कोल्हे) भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो”, अशा शब्दात अजित पवारांनी अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत मतभेद; चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
-“मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल”; अजित पवारांनी उडवली अशोक पवारांची खिल्ली
-पुण्यात महायुतीची महत्वाची आढावा बैठक; खोत, जानकरांना निमंत्रण नाही
-समाविष्ट गावांची थकबाकी वसुली थांबवा; पालकमंत्री अजित पवारांनी दिले आयुक्तांना आदेश