पुणे : देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट पुणे पोलिसांनी उघकीस आणल्यानंतर शहरात आजही गुन्हेगारीचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत. पुण्यात आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चीनमधून ऑनलाइन पद्धतीने कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापणाऱ्या ६ जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ७० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे ऋतिक चंद्रमणी खडसे (वय २२, रा. देहूगाव), सूरज श्रीराम यादव (वय ४१, रा.च-होली) आकाश विराज धंगेकर (वय २२, आकुर्डी), सुयोग दिनकर साळुंखे (वय ३३, रा. आकुर्डी), तेजस सुकदेव बल्लाळ (वय १९, रा. धाराशिव) आणि प्रणव सुनील गव्हाणे (वय ३०, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी ऋतिक हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पदविकाधारक आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करतो. छपाईचा व्यवसाय करण्यासाठी आरोपींनी दिघीतील मॅगझिन चौक परिसरात गाळा भाडेतत्वावर घेतला होता. पुण्यातील अप्पा बळवंत चौकातून छपाईचे जुने मशीन आणले होते. परंतु, छपाईची कामे मिळाली नाहीत. गाळ्याचे भाडे आणि इतर खर्च वाढला आहे. आरोपी सूरजला नोटांचे डिझाइन करता येते, चलनी नोटा छापल्याचा फायदा होईल असे त्याने सांगितले. त्यानुसार अलिबाबा संकेतस्थळावरुन तेजसच्या पत्त्यावर चीनमधून कागद मागविला.
२ लाख बनावट नोटा छापता येतील, इतका कागद चीनमधून मागविण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात ७० हजारांच्या ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली होती. पोलिसांनी बनावट नोटा, छपाई मशिनसह पाच लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष जाधव यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पुणे जिल्हयाला काय काय मिळालं? वाचा एका क्लिकवर
-वसंत मोरेंच्या मनात नेमकं काय? सुप्रिया सुळेंसह घेतली शरद पवारांची भेट, चर्चेला उधाण
-कसब्यातील प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लावा, हेमंत रासनेंनी घेतली पालिका आयुक्तांची भेट
-पुणे शहराला हवा “व्हिजनरी” खासदार, कोणाचे पारडे जड जनताच ठरवणार; हे मुद्दे एकदा वाचाचं