पुणे : लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. आजारपण तसंच वय झाल्यानं अनेक ज्येष्ठ मतदारांना इच्छा असतानाही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येत नाही. मतदान केंद्र घरापासून लांब असल्यानं तसेच मतदान केंद्रापर्यंत जाताना अनेक अडचणी असल्यानं मतदानापासून ही मंडळी वंचित होतात. त्याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होतो. हे टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आता कसबा पोटनिवडणुकीत वापरलेला ‘मतदान पॅटर्न’ देशभरात वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच ८० पेक्षा जास्त वय असणारे आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणाऱ्या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्व निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ८० पेक्षा जास्त वयोगटातील तब्बल २६ लाख ७० हजार, तर शारीरिक विकलांग पाच लाख ९० हजार ३८२ नागरिकांना या सुविधेद्वारे घरातून मतदान करता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पुणे जिल्ह्याचा शुक्रवारी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. ‘केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८० पेक्षा जास्त वयोगटातील आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग नागरिकांसाठी घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ५ दिवसांत जिल्हा प्रशासनाकडून मतदार यादीत नाव असणाऱ्या संबंधित नागरिकांना ‘१२-ड’ हा अर्ज घरोघरी जाऊन दिला जाणार आहे. हा अर्ज या नागरिकांकडून भरून घेतला जाणार आहे. अर्जात संबंधित नागरिकांना घरातून मतदान करणार किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणार, याबाबतची माहिती घेतली जाईल.
या अर्जांवर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी निर्णय घेतील. ज्या मतदारांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य होणार नाही अशा मतदारांचे मत वाया जाऊ नये, म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ही सुविधा सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दिलासादायक! भर उन्हाळ्यात पुणेकरांची पाणी कपात टळली; कालवा समितीच्या बैठकीत निर्णय
-घड्याळात वेळ झाली तुतारी वाजवण्याची; शरद पवार गटाकडून अनावरण सोहळ्याचा व्हिडीओ रिलीज
-शिंदे-फडणवीस-पवार २ मार्चला बारामतीत प्रचाराचा नारळ फोडणार!; अनेक विकासकामांचं उद्घाटन
-कात्रजच्या ‘क्वालिटी बेकरीत’ एक्सपायर फुडची विक्री; हिंदुत्ववादी संघटनेकडून बेकरीची तोडफोड
-Pune Drugs Racket: पुणे पोलिसांच्या धडक कारवायानंतर नाशिक पोलीस प्रशासन सज्ज