पुणे : पुणे शहरात ड्रग्ज प्रकरण काही थंड होत नाही. या प्रकरणाचे जसे धागेदोरे सापडत आहेत तसे पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे आणि नवी माहिती समोर येत आहे. विविध भागात ड्रग्ज साठा जप्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना सरकारवर आणि पुणे पोलिसांवर गरळ ओकली आहे. रविंद्र धंगेकर यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवला होता. त्यातच आता ड्रग्ज प्रकरणी धंगेकरांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आणि गंभीर आरोपही केले आहेत.
“दोन दिवसांपूर्वी शहरांमध्ये मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झालाय. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती परिसरातील सोमवार पेठ भागातील एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर कुरकुंभ एमआयडीसी मधील कारखाना उघडकीस आला असून, या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झाला आहे. आतपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होतं?” असा सवाल यावेळी धंगेकरांनी उपस्थित केला आहे.
“मी ललित पाटील प्रकरणाबाबत वारंवार पोलिसांशी बोलत आलो आहे. तरीदेखील राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास पूर्णपणे केलेला नाही. या प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांनी ज्या पद्धतीने ललित पाटील याला ससून रुग्णालयामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणामधील बाकीच्या लोकांना अटक करण्यात आली. मात्र, संजीव ठाकूर यांना सरकारने पाठीशी घालत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही”, असा आरोप धंगेकरांनी केला आहे.
“सध्याचे सरकार हे याच संस्कृतीला पाठिंबा देत असून, यामुळे तरुण वाईट मार्गाला लागत आहेत. ललित पाटील प्रकरणादरम्यान मी पोलिसांना ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याच्या शक्यतेबाबत कल्पना दिली होती. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र पंजाबनंतर ज्या अमली पदार्थामुळे व्यसनाधीन होत असल्याबाबतची कल्पना पोलिसांना दिली होती. हे ड्रग्ज रॅकेट सोमवार पेठपर्यंत पोहोचले असून, एक नाहीतर अनेक ललित पाटील यामध्ये सक्रिय आहेत”, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
“पुण्यामध्ये पब संस्कृती वाढत असून, हे पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे बनले आहेत. पोलिसांना त्यामध्ये हप्ते मिळणार आहेत. पब संस्कृती पुण्यात नसावी. हे पुणेकरांचं मत आहे तेच माझंही आहे. इतके मोठे रॅकेट पुणे परिसरामध्ये सुरू असताना याचा साधा सुगावा पोलिसांना न लागवा हे पोलिसांचे अपयश असून, पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे” असे रविंद्रे धंगेकर म्हणाले आहेत.
हुक्का पार्लरच्या नावाखाली अमली पदार्थ मिळतात. येत्या २ दिवसांत हुक्का पार्लर बंद झाले नाही तर मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन हुक्का पार्लर बंद करणार, होणाऱ्या परिणामाला पोलीस जबाबदार असतील, याची पोलिसांनी नोंद घ्यावी, असा इशारा रविंद्र धंगेकरांनी सरकार आणि पुणे पोलिसांना इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राजकारणात नवा ट्विस्ट: पवार घराण्यातील आणखी एका वारसदाराची राजकारणात एन्ट्री! शहरात बॅनरची चर्चा
-नसांच्या दुर्लक्षित स्थितीच्या उपचारांसाठी मणिपाल हॉस्पिटल खराडीने सुरु केले ‘स्पेशलाईझ्ड क्लिनिक’
-‘पुण्यात फडणवीस किंवा कोणी वरिष्ठ नेता ही निवडणूक लढो, जिंकणार मीच’- रविंद्र धंगेकर
-पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे ‘कोडवर्ड’ आले समोर; ‘लंबा बाल’, ‘मुंबई बंदर’ आणि ‘न्यू जॉब पुणे’
-सदाशिव पेठेतील जिममधील सामानाची चोरी; ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी