पुणे : पुणे शहरात ड्रग्ज प्रकरण दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे पोलिसांनी धडक कारवाया करत शहरातील तसेच इतर काही भागातून ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या ड्रग्ज संबंधित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली. त्या चौकशीमध्ये पोलिसांना अनेक धागेदोरे सापडत गेले आहेत.
पुणे शहरातून तब्बल ७१७ किलो आणि दिल्लीतून ९७० तर सांगलीमधून १४० किलो एमडी ड्रग्ज साठा पुणे पोलिसांनी जप्त केला आहे. त्यातच आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचे कनेक्शन दुबई किंवा अंडरवर्ल्डशी असल्याची शक्यता वर्तवली आहे.
‘पुण्यातील ड्रग्स कनेक्शन अंडरवर्ल्ड किंवा दुबईपर्यंत पोहचू शकते. याप्रकरणात आत्तापर्यंत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यामधून ७१७ किलो आणि दिल्लीच्या साऊथ एक्स्टेन्शन भागातून दोन ठिकाणांवरील तीन गाळयांमधून ९७० किलो ‘एमडी’ जप्त केले आहे. तर, सांगलीमधून १४० किलोच्या घरात ‘एमडी’ जप्त करण्यात आले आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत.
पुण्यात निर्मिती करण्यात आलेले हे ड्रग्ज थेट लंडनमध्ये विकण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. जानेवारी महिन्यात लंडनमध्ये कुरियरद्वारे हे ड्रग्ज पाठविण्यात आले. विविध प्रकारच्या फूड पॅकेट्समधून हे कुरियर पाठवण्यात आले असून ते विमानाने गेले की समुद्रमार्गे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
पुणे पोलिसाांनी या प्रकरणात आतापर्यंत पुणे आणि दिल्लीसह सांगलीमध्ये केलेल्या कारवाईत एकूण १,८०० किलो ‘एमडी’ जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मूल्य तब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे अमितेश कुमार म्हणाले आहेत. दिल्लीमध्ये पकडण्यात आलेले ९७० किलो एमडी आणण्याकरिता गुन्हे शाखेच्या मदतीला शीघ्र कृती दलाची (क्यूआरटी) दोन पथके देण्यात आली आहेत.
पुणे ‘गुन्हे शाखा युनिट एक’चे पोलीस हवालदार विठ्ठल वसंतराव साळुंखे (वय ४७) यांनी फिर्याद दिली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. सोमवार पेठ), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय ४०, रा. विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय ४०), युवराज बब्रूवान भुजबळ (वय ४१, रा. डोंबिवली पश्चिम), दिवेश चिरंजीव भुतिया (नवी दिल्ली), संदीप राजपाल कुमार (रा. नवी दिल्ली) आणि संदीप हणमंतसिंग यादव (रा. नवी दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींपैकी भिमाजी साबळे आणि युवराज भुजबळ यांना न्यायालयाने २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, माने, करोसिया आणि शेख हे यापूर्वीच पोलीस कोठडीत आहेत. उर्वरित आरोपींना दिल्ली न्यायालयाच्या परवानगीने पुण्यात आणण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी; धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
-शिक्षण फक्त दुसरीपर्यंतच मात्र, ५ राज्यातला अट्टल ड्रग्जमाफिया अखेर पोलिसांच्या ताब्यात
-१३६ वर्षांनंतर इतिहास घडला! वारसा आजोबा अन् वडिलांचा आता लेकही बनली ‘फायरमन’
-‘अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं’; अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार
-पुणेकरांनो मिळकतकर भरायला विसरू नका, अन्यथा प्रॉपर्टी होईल जप्त