पुणे : पुणे शहरातील नागरिकांनी अनेक कारणांवरुन मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींवर महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा ठपका आता जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेवला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) आलेल्या १४१ तक्रारींची माहिती पुणे महापालिकेला पाठविण्यात आली आहे, मात्र कोणत्याही तक्रारीची पालिका दखल घेत नसल्याचं सांगितलं जात आहे. यावर तातडीने निर्णय घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडे नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येतात. या तक्रारी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागांना पाठविण्यात येतात. पुणे महापालिकेकडे १४१ प्रलंबित तक्रारींची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविली. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी रस्त्यांशी संबंधित बांधकाम विभागाच्या आहेत.
खड्डे, चेंबर तसेच रस्त्यांच्या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. याबाबतच्या तक्रारी महापालिकेकडे दाखल झाल्या असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. अतिरिक्त आयुक्तांना या तक्रारींची खातरजमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानुसार, आज, मंगळवारी सकाळी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व विभागप्रमुखांना तक्रारींबाबतची सर्व माहिती घेऊन चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या २२ विभागांकडील १२७ तक्रारींचा समावेश आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या तक्रारींची संख्या १४ आहे. या तक्रारींवर घेतलेल्या निर्णयांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि संबंधित तक्रारदारांना कळविण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५५ कोटी रुपयांचे मेफेड्रॉन जप्त
-पुण्यातील हॉटेल्स आणि पब धिंगाण्याबाबत पोलिसांची नियमावली जाहीर
-पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ४ कोटींचे ड्रग्ज जप्त; आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय
-पिंपरी-चिंचवडचे सहायक आयुक्त लाच प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात
-पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; परिसरातील गाड्यांची तोडफोड करत कोयते हवेत भिरकावले