पुणे : अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिरुरसह ४ जागांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दावा केला आहे. त्याप्रमाणे लोकसभेची तयारीही सुरु केली आहे. शिरुर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभा जागेवर कोणी दावा करु नये असा इशारा दिला आहे.
पुण्यातील मोहम्मदवाडी येथे सेना केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरेंच्या वतीने करण्यात आलं होतं. याप्रसंगी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकारासोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी शिरुर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत भाष्य केले आहे.
‘’लोकसभेची उमेदवारी मी कधीही सोडली नव्हती. लोकसभेसाठी मी फार पूर्वीपासून तयारी करत आहे. तुम्हाला टीव्हीवर जरी अमोल कोल्हे दिसत असले तरी मी जमिनीवरती उतरून काम करत आहे. गेले पाच वर्ष मी रोज 12 गावे फिरत असून पूर्ण ताकदीने कामाला लागलो आहे. शिरुरची २०२४ची लोकसभा मी लढवणार. शिरुरमध्ये महायुतीचा उमेदवार असेल. ती जागा आमचीच आहे, आम्ही निवडून येणार, म्हणून कोणीही दावा करु नये’ असा थेट इशारा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला आहे. यावरुन महायुतीमध्ये शिरुरच्या जागेबाबत नेमकं काय घडणार? या जागेबाबत काय समीकरण असेल हे पाहणं औत्सक्याचं ठरणार आहे.
म्हाडाचे अध्यक्षपद मला मिळणं आणि लोकसभेची उमेदवारी याचा एकमेकांशी काही संबंध नाही. त्यामुळे काही लोकांना माझा लोकसभेचा पत्ता कट झालाय असं वाटतंय त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दीड वर्षापासून एखादं पद मला मिळावं यासाठी आग्रही होते. आठ महिन्यापूर्वी म्हाडाचे पद मला देण्याबाबत प्रशासकीय प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी मी कोणताही पाठपुरावा केला नाही. दोन दिवसापूर्वी त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन मला ते पद मिळालं आहे’, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
शिरूरच्या जागेवरती राष्ट्रवादीने आपला दावा सांगितला असेल मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला न थांबता लोकसभेच्या तयारीचे काम सुरू ठेवण्यास सांगितले आहे. पूर्वी ही जागा राष्ट्रवादीने लढवलेली असली तरी सध्या विजयी झालेला उमेदवार त्यांच्याकडे नाही. तो उमेदवार शरद पवार गटाकडे आणि महाविकास आघाडीकडे आहे. तो उमेदवार जर अजित पवारांकडे असता तर शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दाव्याला अर्थ आला असता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही शिरूरची जागा ताकदीने लढणार आहोत, असं स्पष्ट मत आढळराव पाटलांनी व्यक्त केलं आहे.
मी महायुतीचा उमेदवार असून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी सर्व पक्ष काम करतील आणि मी निवडून येईन, असा ठाम विश्वास आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शिरुर लोकसभेत महायुतीच्या कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘राजकारण म्हणजे भातुकलीचा खेळ नाही, मी कुटुंबात राजकारण आणत नाही’; सुप्रिया सुळेंचा पलटवार
-धक्कादायक! पोलीस स्टेशनसमोर पेटवून घेतलेल्या त्या तरुणाची मृत्यूशी झुंज अपयशी
-पुणे लोकसभा उमेदवारीच्या आखाड्यात मुरलीधर मोहोळ बाजी मारणार?
-खरंच महिला सुरक्षित??? पिस्तुलाचा धाक दाखवत केला बलात्कार
-धक्कादायक! दारुच्या नशेत नराधमानं फुटपाथवरील महिलेवर केला बलात्कार