पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी आपल्याला कुटुंबाने एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. त्यातच त्यांनी कार्यकर्ते आणि श्रोत्यांना भावनिक आवाहन देखील केले. त्यांच्या या भावनिक होण्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटाचे नेते आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
“अजित पवार अशा पद्धतीने नागरिकांना भावनिक करतील असे वाटले नव्हते. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय नागरिक आणि पवार कुटुंबीयांना आवडलेला नाही. भाजपला जे जमलं नाही ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने ‘पवार विरुद्ध पवार’ असा संघर्ष उभा करुन केलं आहे”, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवाराच्या भावनिक होण्यावर टीका तर केलीच मात्र भाजपलाही धारेवर धरलं आहे. रोहित पवार हे आज आळंदीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
“त्यांना आणखी काय हवं होतं?”
‘मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर वेगळं काहीतरी मिळालं असतं. महाराष्ट्रातील निर्णय घेण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर होती. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले, असं असताना त्यांना आणखी काय हवं होतं? पदच हवं होतं ना. भाजपकडे जाण्याचं कारण पदच आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जे भाजप ला जमलं नाही. ते अजित पवारांच्या माध्यमातून भाजप करून घेत आहे. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष जो भाजप उभा करत आहेत. दुर्दैवाने तो अजित पवार यांच्या माध्यमातून शेवटचा प्रयत्न केला जात आहे’, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल
“अजित पवार बारामतीमध्ये ज्या पद्धतीने ते बोलत होते तिथे मला असे वाटले होते की लोकसभेची लढत ही बारामतीमध्ये ‘पवार विरुद्ध पवार’ होईल. सुप्रियाताई या ठिकाणी खासदार आहेतच. आता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी भाजपने मुद्दामहून अजित दादांवर टाकलेली आहे. जे आजपर्यंत भाजपला जमलेले नव्हते ते त्यांनी आता दुर्दैवाने कुटुंब आणि पक्ष फोडून ते करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेव्हा त्यांच्याकडून अधिकृतपणे याची घोषणा होईल, तेव्हाच मला यावर सविस्तर बोलता येईल. उमेदवारी दिल्यानंतर पुढे काय करायचे हे लोक ठरवतील, पवारसाहेब ठरवतील” असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-स्वाती मोहोळला धमकावणारा ससूनमधून पळाला होता; मार्शल लीलाकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात
-भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर
-हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’